ठड उल्लू बनाविंग...

By Admin | Updated: December 1, 2014 00:20 IST2014-11-30T21:13:41+5:302014-12-01T00:20:36+5:30

सुपरहिट

Making cold owls ... | ठड उल्लू बनाविंग...

ठड उल्लू बनाविंग...

‘कोकणातून थेट मराठवाड्यात पाणी नेऊ पाहणारा आधुनिक भगीरथ भूतलावर दिसू लागलाय,’ अशी दवंडी पिटताच इंद्रदरबारातील सर्वांचेच कान टवकारले गेले. ‘दैवी शक्तीची वल्गना करणारा हा मानव कोण.. मुनीऽऽजी?’ असा तिरकस सवाल देवाधिराजांनी केला. क्षणभर डोळे मिटत नारदमुनींनी वीणेची तारही झंकारली. मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्याकडं पाहत ‘मेरी किस्मत में तू नही शायद, क्यूँ तेरा इंतजार करता हूँ..’ असं विरहगीत आळविणाऱ्या ‘एकनाथ’रावांचा चेहरा मुनींच्या मनचक्षूसमोर तरळला. ‘हे काम खान्देशातल्या एकनाथांचं महाऽऽराज.’ मुनींनी देवाधिराजांना सांगितलं.
इंद्रदरबारात काहीजण कुजबुजले, ‘म्हणजे, पाणी पाजणाऱ्या एकनाथांची परंपरा आजही सुरू आहेच म्हणा की.’ तेव्हा नारद गालातल्या गालात हसत उत्तरले, ‘त्या संत एकनाथांनी गाढवाला पाणी पाजलं; पण या नेते एकनाथांनी पाण्याचं स्वप्न दाखवून जनतेला गाढव बनवलं!’ हे ऐकून दरबार चमकला. आचार्य अत्रेंच्या भाषेत पुढच्या दहा हजार वर्षांत होणे नाही, असे ‘एक से एक भन्नाट कल्पनाविलासी प्रकल्प’ येत्या पाच वर्षांत कागदावर रंगतील, हेही अनेकांच्या लक्षात आलं... कारण जिथं साधं उरमोडीचं पाणी शेजारच्या माण-खटाव तालुक्यांत पोहोचायला पंचवीस-तीस वर्षे लागली, तिथं खालच्या कोकणातलं पाणी वरच्या मराठवाड्यात कसं शक्य? असा प्रश्न दरबारात उभा ठाकला.
तेव्हा देवाधिराजांनी आदेश दिला, ‘मुनीजीऽऽ तत्काळ भूतलावर जा. कोण कुठं कसं जनतेला वेड्यात काढतंय, याचा शोध घ्या अन् त्याची माहिती द्या. मात्र, शासकीय समिती नेमून दहा वर्षांनंतर सादर केल्या जाणाऱ्या अहवालाप्रमाणं नको.. माहिती तत्काळ हवी!’ वीणा वाजवत नारदमुनी भूतलावरील सातारा शहरात अवतरले; मात्र त्यांना आज इथं सारंच कसं-कसं अनोळखी वाटू लागलेलं.. कारण इथली काही ‘खादी’धारी मंडळी चक्क राजपथालगतचा रस्ता झाडत होती.
‘पालिकेतले पूर्वीचे ठेकेदार जसं आता नगरसेवक बनले, तसंच आरोग्य कर्मचारीही नेते बनले की काय,’ असा प्रश्न मुनींच्या डोक्यात तरळून गेला. ते जवळ जाऊन पाहतात तर काय, रस्त्यावर झाडू मारणारे चक्क ‘मेंबर’च होते. रस्त्यावरचा कचरा उचलताना चौकातल्या दोन्ही राजेंच्या फ्लेक्सकडंही ते तिरक्या नजरेनं पाहत होते. मुनींनी हळूच झुटिंगरावांच्या कानात खोचकपणे विचारलं, ‘या मंडळींनी अख्खी पालिका झाडून साफ केली. आता रस्तेही सोडणार नाही वाटतं!’ मात्र, झुटिंगराव नेहमीप्रमाणं वेगळ्याच कामात दंग होते. ‘सर्वोत्कृष्ट साफसुथरा मेहरबान’ पुरस्काराचे ‘मेमेंटो’ तयार करण्यात ते गुंतले होते. बाजूलाच सहकार अन् पत्रकार क्षेत्रातले ‘टू इन वन’ नेते ‘विनोद’रावही कुणाला कोणता पुरस्कार द्यायचा, याचं ‘प्रॉम्टिंग’ करत होते.
गोंधळलेल्या मुनींनी ‘पालिकेचा कारभार नेमकं कोण चालवतंय होऽऽ?’ असा सवाल शेजारून चाललेल्या सर्वसामान्य सातारकराला विचारला. ‘गेली दहा वर्षे जे आम्हाला समजलं नाही, ते आता तुम्हाला कसं सांगू?’ असा प्रतिप्रश्न या पेठकरी सातारकरानं केला. ‘सातारच्या साम्राज्यात कधीच प्रश्न विचारायचे नसतात!’ हा भावही बिच्चाऱ्याच्या चेहऱ्यावर उमटला होता.
एवढ्यात समोरून ‘अकरा-अकरा’ नंबरची काळी गाडी आली. कानाला मोबाईल लावून गाडीतून बाबाराजे खाली उतरले. त्यांच्यासोबत दोन-चार पोलीसही होते. मुनींनी खोदून-खोदून विचारताच एकानं खाकी टोपी नीट करत हळूच सांगितलं, ‘दगडफेकीची अन् टोलनाका जाळण्याची भाषा अलीकडं बाबांच्या तोंडी सारखं येऊ लागलीय. म्हणून एसपी साहेबांनी मुद्दाम आम्हाला त्यांच्यासोबत ठेवलंय.’ मुनी गालातल्या गालात हसले. जेव्हापासून बाबांनी ‘सिंघम’ स्टाईल मिशा ठेवल्या, तेव्हापासूनच त्यांची भाषा आक्रमक बनलीय, हे गुपित फक्त मुनींनीच ओळखलं होतं.
बाबा मोबाईलवर बोलता-बोलता ‘थँक्यू पाटीलऽऽजी... थँक्यू. थँक्यू.’ असं काहीबाही म्हणाले. त्यांचं हे बोलणं ऐकून ‘आता हे पाटील कोण?’ असा प्रश्न मुनींना पडला. कारण, चमकोशेठ ‘पाटलांचे प्रवीण’ सोडले तर ‘भोसले, चव्हाण अन् कदम’ यांचाच नेहमी बाबाराजेंभोवती गोतावळा. मोठ्या राजेंकडं मात्र कैक पाटलांचीच मांदियाळी; पण या पाटलांशी म्हणजे ‘निशांत अन् नरेंद्र’शी बाबाराजे कशाला बोलतील, हेही मुनींच्या लक्षात आलेलं.
मुनींच्या चेहऱ्यावरचा गोंधळ पाहून बाबाराजे उत्तरले, ‘पाटील म्हणजे, चंद्रकांत पाटील होऽऽ. त्यांच्यामुळंच सुतावरनं स्वर्ग गाठणं शक्य झालं नां आम्हाला,’ मुनींचं कोडं सुटलं. ते हसले. वर्षानुवर्षे ‘कमळ’वाल्यांच्या सानिध्यात राहून मोठ्या राजेंनाही जे जमलं नाही, ते बाबाराजेंनी चुटकीसरशी करून दाखविलं, हे मुनींच्या लक्षात आलं. त्यांनी दोन्ही हात जोडून बाबाराजेंना नमस्कार केला. मुनी वदले, ‘राजे, खरंच तुम्ही गे्रट.. छान समीकरणं जुळवलीत बघा. दिल्लीत नरेंद्र. मुंबईत देवेंद्र अन् साताऱ्यात शिवेंद्र.’ एवढ्यात मागून आवाज आला, ‘पण विसरू नका होऽऽ राजेंद्र!’ बाबाराजे अन् मुनींनी दचकून मागं बघितलं, तेव्हा ‘पवारांच्या दीपकसोबत चोरगेंचे राजेंद्र’ हसत पुढं आलेले. या दोघांच्याही हातात ‘साताऱ्याची हद्दवाढ अन् त्यानंतरच्या पालिका निवडणुकीतील कमळवाल्यांची व्यूहरचना’ ही चंद्रकांतदादांचीच गुप्त फाईल चमकत होती.

सचिन जवळकोटे

Web Title: Making cold owls ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.