बारामतीची मुलगी अभिमानानं माणची सून बनावी

By Admin | Updated: January 7, 2015 23:54 IST2015-01-07T22:49:37+5:302015-01-07T23:54:18+5:30

जयकुमार गोरे : समता पुरस्कार प्रदान ; दुष्काळी भागाची हरितक्रांतीकडे वाटचाल

Make Baramati's daughter Abhimanan Manchat Soon | बारामतीची मुलगी अभिमानानं माणची सून बनावी

बारामतीची मुलगी अभिमानानं माणची सून बनावी

खंडाळा : ‘स्वप्नं ही उघड्या डोळ्यांनी पाहायची असतात. माण-खटावच्या जलक्रांतीचे स्वप्न मी पाहिले होते. गेल्या पाच वर्षांत जलसंधारणाची अनेक कामे मार्गी लागली आहेत. साखळी सिमेंट बंधाऱ्याचे काम राज्याला दिशादर्शक ठरलेले आहे. माणची भूमी सुजलाम्-सुफलाम् व्हावी, तेथे हरितक्रांती घडावी हेच माझे पुढील स्वप्न आहे. बारामतीची मुलगी अभिमानाने माणची सून म्हणून येईल, तेव्हाच हे स्वप्न साकार होईल,’ असे मत आमदार जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले.
अंदोरी, ता. खंडाळा येथे महात्मा फुले समता विचार मंचच्या वतीने ‘महात्मा फुले समता’ पुरस्कार देऊन आ. गोरे यांना गौरविण्यात आले. यावेळी कामधेनू सेवा परिवाराचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मणराव आसबे, सहायक पोलीस निरीक्षक अजित दळवी, अजय धायगुडे, सोमनाथ भोसले, संजय गांधी, दिनेश वीरकर, शंकरराव क्षीरसागर, सुरेश रासकर, जयवंत शिंदे, महेंद्र माने, अतुल पवार, सुजित डेरे, विलास माने, अनिल क्षीरसागर आदी उपस्थित होते.
आ. गोरे म्हणाले, ‘आपल्या राष्ट्रपुरुषांना दीडशे वर्षांपूर्वी जे कळले, ते आज राजकर्त्यांना उमगले आहे. त्यांच्या विचारांनी काम केले तरच राष्ट्राची प्रगती होणार आहे. समाजासाठी काम करणे हेच माझे ब्रीद वाक्य बनले आहे. माझ्या माण-खटावमधील माताभगिनींना सहा महिने केवळ पाणी आणण्याचे काम करावे लागत होते. मात्र, आता मी दुष्काळाचा कलंक पुसण्यात यशस्वी झालो आहे. आता शासनाने सुरू केलेली ‘जलयुक्त शिवार’ योजना आमच्या माण-खटावचीच आहे. पाणी प्रश्नावर काम करताना मी इतिहास केला. मात्र, अंदोरीकरांनी मला पुरस्कारायोग्य समजून खऱ्या अर्थाने ‘जलनायक’ बनविले आहे.’
कार्यक्रमाला बाळासाहेब ननावरे, नानासाहेब ननावरे, संजय जाधव, सुधाकर होवाळ, भिकू ननावरे, किसन ननावरे, दत्तात्रय दगडे, धनाजी जाधव, वसंत दगडे, विश्वास दगडे, शांतराम होवाळ, ज्योतिराम दगडे, नामदेव ननावरे, पंडित ननावरे, नवनाथ ससाणे, रवींद्र दगडे आदी उपस्थित होते. प्रकाश दगडे यांनी स्वागत केले. ज्ञानेश्वर ससाणे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)

फुले दाम्पत्यांचा आदर्श...
‘माण आणि खटाव तालुक्यांत आणखीही जल साठवणुकीचे काम होणे महत्त्वाचे आहे. त्या तालुक्यात हरितक्रांती घडावी हे माझे स्वप्न आहे, म्हणून दीडशे वर्षांपूर्वी फुले दाम्पत्यांनी केलेल्या कामाचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून वाटचाल करीत आहे,’ असेही आमदार जयकुमार गोरे यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Make Baramati's daughter Abhimanan Manchat Soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.