Maharashtra Rain Updates: कालची रात्र काळरात्र ठरली! साताऱ्यात दरड कोसळून १२ जणांचा मृत्यू; मदतकार्य सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 16:05 IST2021-07-23T16:02:35+5:302021-07-23T16:05:45+5:30
Maharashtra Rain Updates: सातारा जिल्ह्यातील आंबेघरमध्ये भूस्खलन; घटनास्थळी मदतकार्य सुरू

Maharashtra Rain Updates: कालची रात्र काळरात्र ठरली! साताऱ्यात दरड कोसळून १२ जणांचा मृत्यू; मदतकार्य सुरू
सातारा: महाडच्या तळीये गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत ३८ जणांचा मृत्यू झालेला असतानाच साताऱ्यातील आंबेघर गावात दरड कोसळली आहे. या दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. पोलीस आणि स्थानिक प्रशासनानं घटनास्थळी तातडीनं मदतकार्य सुरू केलं आहे.
रायगडच्या महाड तालुक्यातील तळीये गावात दरड कोसळून ३८ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना साताऱ्यातही भीषण दुर्घटना घडली. मोरणा विभागात येणाऱ्या आंबेघर येथे दरड कोसळल्याची घटना घडली आहे. गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून आंबेघर येथील काही घरं मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली आहेत. या घटनेची माहिती समजताच काही ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले आहेत. मात्र त्याठिकाणी तीन कुटुंबातील लोक रात्रीपासून बेपत्ता असल्याचे सद्यस्थितीत समोर येत आहे.
घटनास्थळी ग्रामस्थांनी तातडीनं मदत कार्य सुरू केलं आहे. मुसळधार पावसामुळे मदत कार्यात अडचणी येत आहेत. या भागातील प्रमुख रस्ते पाण्याखाली गेले आहेत. दरम्यान पाटण तालुक्यातील ढोकावळे येथेही घरांची पडझड होऊन मातीच्या ढिगाऱ्याखाली काही लोक अडकल्याचे सांगण्यात येत आहे, तर किल्ले मोरगिरी येथेही दरड कोसळल्यानं महादेवाचे मंदिर मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलं आहे. येथील परिसरातील ग्रामस्थांना प्रशासनानं सुरक्षित स्थळी हलवलं आहे.