महाबळेश्वरचे हॉटेल सील; साता-याचे अधिकारी मुंबईत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 04:53 IST2017-12-27T04:53:50+5:302017-12-27T04:53:52+5:30
सातारा : लग्नाच्या वरातीमध्ये डीजे वाजवून ध्वनी प्रदूषण केल्याप्रकरणी महाबळेश्वरमधील ‘हॉटेल किज’ला सील ठोकल्याच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या दालनात सातारा जिल्ह्यातील अधिका-यांची टीम दाखल झाली.

महाबळेश्वरचे हॉटेल सील; साता-याचे अधिकारी मुंबईत
सातारा : लग्नाच्या वरातीमध्ये डीजे वाजवून ध्वनी प्रदूषण केल्याप्रकरणी महाबळेश्वरमधील ‘हॉटेल किज’ला सील ठोकल्याच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या दालनात सातारा जिल्ह्यातील अधिका-यांची टीम दाखल झाली. हॉटेलच्या जल प्रदूषणासह इतर अनेक बाबींची मंगळवारी बैठकीत चर्चा झाली.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कुटुंबीयांसह महाबळेश्वरमध्ये मुक्कामी असताना ‘हॉटेल किज’मध्ये लग्नाच्या वरातीत डीजे वाजविला म्हणून ध्वनी प्रदूषणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावर अधिवेशनात चर्चाही झाली. त्यानंतर पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या आदेशानुसार महाबळेश्वरमधील सर्वात मोठ्या हॉटेलचे नळ कनेक्शन तोडण्यात आले. विद्युत पुरवठा खंडित करून हॉटेलला सील ठोकण्यात आले.
मंगळवारी अतिरिक्त जिल्हा अधिकारी साहेबराव गायकवाड यांच्यासह प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच महाबळेश्वर नगरपालिकेच्या अधिकाºयांची बैठक कदम यांच्या दालनात झाली. हॉटेलमध्ये जल प्रदूषणही मोठ्या प्रमाणात झाल्याचा अहवाल अधिकाºयांनी सादर केल्यानंतर पुढील कारवाईबाबतची चर्चा झाली.
ध्वनी प्रदुषणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनाही गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या दालनात पाचारण करण्यात आले होते. महाबळेश्वरमधील इतर हॉटेल्समध्येही यापुढे गोंधळ घातला जाऊ नये, याचीही चर्चा झाली. बुधवारी पोलिसांनी महाबळेश्वरमधील हॉटेल चालकांची तातडीने बैठक बोलाविली आहे.
या घटनेची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली होती़ उद्धव यांना त्रास होतो म्हणून हॉटेलवर कारवाई केली जाते़ मग सर्वसामान्यांना त्रास होत असताना कारवाई का होत नाही, असा आरोपही काहींनी केला़
प्रदुषण मंडळाने तत्पर होऊन याप्रकरणी तात्काळ कारवाई केली़ इतर ठिकाणीही ध्वनी प्रदुषण झाल्यास मंडळाने कोणाचीही हयगय न करता कारवाई करावी, अशी मागणीही जोर धरू लागली़