महाबळेश्वरनं पांघरला ‘प्लास्टिक शालू’
By Admin | Updated: June 15, 2014 00:14 IST2014-06-15T00:13:59+5:302014-06-15T00:14:48+5:30
सर्वाधिक पाऊस : तीन-तीन मजली इमारतींनाही भलं मोठं आच्छादन

महाबळेश्वरनं पांघरला ‘प्लास्टिक शालू’
महाबळेश्वर : महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळख असणाऱ्या महाबळेश्वरवासीयांना मान्सूनची चाहूल लागली आहे. पावसापासून संरक्षण करण्यासाठी घराबरोबरच मोठमोठी हॉटेल्सही प्लास्टिकच्या आच्छादनात बंदिस्त होऊ पाहत आहे.
महाबळेश्वरचे वार्षिक पर्जन्यमान सरासरी चार ते पाच हजार मिलीमीटर इतके आहे. मुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा अन् थंडीचा विलक्षण खेळ इथे पाहावयास मिळतो. यासर्व बाबींचा स्थानिक नागरिक तसेच उद्योग, व्यवसायांवर परिणाम होतो. घरात, दुकानात तसेच हॉटेलमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने सर्वांची तारांबळ होताना दिसते. पावसाचे पाणी हे घर व इमारतींच्या स्लॅब मधून झिरपून घरात येते. त्यामुळे घराच्या भिंती पडण्याबरोबरच जमीन खचण्यासारख्या घटना इथे नेहमीच होत असतात. अशा घटनांपासून बचाव करण्यासाठी नागरिक व व्यापारी पावसाळा सुरू होण्याअगोदर खबरादारीचे सर्व उपाय करतात.
सध्या घरांना प्लास्टिक कागद अथवा झड्यांनी बंदिस्त करण्यासाठी नागरिकांची लगबग इथे सुरू झाली आहे. व्यापारी व हॉटेल व्यावसायिक देखील या कामात गुंतले आहेत. पावसात इलेक्ट्रिक वस्तूंबरोबरच अन्य वस्तूंचे मोठे नुकसान होत असल्याने या वस्तूंच्या सुरक्षिततेची योग्य ती काळजी घेतली जात आहे. मोठमोठ्या हॉटेल्स्ना गवताच्या झड्या लावणे शक्य नसल्याने अशी हॉटेल्स प्लास्टिक कागद अथवा पत्र्यांच्या आच्छादनाने बंदिस्त होऊ लागली आहेत. पावसाची मजा लुटण्यासाठी भेट देणाऱ्या पर्यटकांची मात्र यामुळे नेहमीच फसगत होताना दिसते. (प्रतिनिधी)