महाबळेश्वरात दिवाळी सुट्ट्यांमुळे पर्यटकांची तुफान गर्दी; वाहतूक कोंडी, खड्डे यामुळे लोक त्रस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 21:05 IST2025-10-23T21:05:10+5:302025-10-23T21:05:29+5:30
दिवाळी सुट्टीमुळे शहरातील हॉटेल्स आणि लॉज पर्यटकांनी गजबजून गेले आहेत, टॅक्सी टंचाई आणि खराब रस्त्यांमुळे त्रास

महाबळेश्वरात दिवाळी सुट्ट्यांमुळे पर्यटकांची तुफान गर्दी; वाहतूक कोंडी, खड्डे यामुळे लोक त्रस्त
महाबळेश्वर: जागतिक पर्यटनस्थळ म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वरमध्ये यंदाच्या दिवाळी हंगामाची जोरदार सुरुवात झाली असून, पर्यटकांच्या प्रचंड गर्दीने डोंगरराया पुन्हा एकदा गजबजल्या आहेत. गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश तसेच मुंबई-पुण्यासह राज्याच्या विविध भागांतून पर्यटक मोठ्या संख्येने महाबळेश्वर आणि तापोळा परिसरात दाखल झाले आहेत.
दररोज मुंबईहून तब्बल ४० बसेस पर्यटकांसह महाबळेश्वरात दाखल होत आहेत, तर खाजगी चारचाकी वाहनेही हजारोंच्या संख्येने पर्यटन नगरीत प्रवेश करत आहेत. परिणामी, शहरातील सर्व मुख्य मार्गांवर दिवसभर वाहनांची मोठी गर्दी आणि वाहतूक कोंडी जाणवत आहे. थंड वारे, हिरवागार निसर्ग आणि कोवळं ऊन यांचा आनंद घेण्यासाठी विविध पर्यटन स्थळांवर गर्दी उसळली आहे. वेण्णा लेकवर नौकाविहारासाठी तुडुंब झुंबड असून, घोडेस्वारी आणि मका-कणीसाचा आस्वाद घेत पर्यटकांनी सुट्टीचा आनंद खुलवला आहे. मुख्य बाजारपेठेत अधूनमधून पडणाऱ्या अवकाळी पावसातही खरेदीला मोठी गर्दी असून, कोल्हापुरी चपला, हिवाळी कपडे आणि स्ट्रॉबेरी उत्पादने विक्रीचा उच्चांक गाठत आहेत.
दिवाळी सुट्टीमुळे शहरातील हॉटेल्स आणि लॉज पर्यटकांनी गजबजून गेले आहेत. अनेक हॉटेल्स ‘हाऊसफुल’ झाल्या असून, खोल्यांचे दर चांगलेच वाढले आहेत. टॅक्सींची टंचाई निर्माण झाल्याने अनेक पर्यटकांना स्थानिक पर्यटनस्थळांना जाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. दरम्यान, वाई–महाबळेश्वर मार्गावरील रस्त्यांची दुरवस्था पर्यटकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. धुळीने माखलेले आणि खड्डेमय रस्त्यांमुळे प्रवास त्रासदायक झाला आहे. महाबळेश्वर–पाचगणी रस्त्यालगत असलेल्या ढाबेवाल्यांना धुळीच्या त्रासामुळे वारंवार रस्त्यावर पाणी मारावे लागत आहे.
वाहतूक कोंडी, पार्किंगची अपुरी सोय आणि अरुंद रस्त्यांमुळे पर्यटकांची मोठी गैरसोय होत असून, अनेकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे रस्त्यांची तातडीने दुरुस्ती व वाहतूक व्यवस्थेतील सुधारणा करण्याची मागणी केली आहे. पर्यटन हंगामात वाढत्या गर्दीचा सामना करण्यासाठी महाबळेश्वर गिरिस्थान नगरपालिकेचे मुख्याधिकारी योगेश पाटील आणि महाबळेश्वर पोलिस प्रशासनाने बापूसाहेब सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी वर्गासह कंबर कसली आहे. पर्यटकांना सुविधा, वाहतूक शिस्त आणि स्वच्छता राखण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. दिवाळी हंगामामुळे शहरात व्यापारी उलाढाल वाढली असली तरी पायाभूत सुविधांच्या अभावामुळे महाबळेश्वरच्या पर्यटनसुविधा सक्षम करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.