कित्येक महिन्यांनंतर महाबळेश्वर पर्यटनासाठी खुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:26 IST2021-06-20T04:26:02+5:302021-06-20T04:26:02+5:30
अजित जाधव महाबळेश्वर : ‘कोरोनाबाधितांचे प्रमाण व ऑक्सिजन बेडच्या वापराचे प्रमाण साधारण नऊ टक्क्यांपर्यंत आल्यामुळे जिल्ह्याचा तिसऱ्या स्तरामध्ये समावेश ...

कित्येक महिन्यांनंतर महाबळेश्वर पर्यटनासाठी खुले
अजित जाधव
महाबळेश्वर : ‘कोरोनाबाधितांचे प्रमाण व ऑक्सिजन बेडच्या वापराचे प्रमाण साधारण नऊ टक्क्यांपर्यंत आल्यामुळे जिल्ह्याचा तिसऱ्या स्तरामध्ये समावेश झाला. त्यामुळे जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवांसोबत गेले दोन-तीन महिने बंद असलेल्या आवश्यक सेवाही सायंकाळी चारपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. शनिवार व रविवारचा वीकेंड लॉकडाऊनही रद्द करण्यात आला. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी अनलॉक संदर्भात शुक्रवारी आदेश दिले. त्यामुळे महाबळेश्वरवासीयांना दिलासा मिळाला आहे.
पर्यटकांना दांडेघर नाक्यावर रॅपिड अँटिजन टेस्ट बंधनकारक करण्यात येणार असल्याची माहिती प्रांताधिकारी संगीता राजापूरकर यांनी दिली.
हिरडा विश्रामगृहावर पार पडलेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील, गटविकास अधिकारी नारायण घोलप, पाचगणी मुख्याधिकारी गिरीश दापकेकर, भक्ती जाधव, डी. एम. बावळेकर, संतोष शिंदे, व्यापारी प्रतिनिधी अतुल सलागरे, हॉटेल संघटनेचे अध्यक्ष मनीष तेजाणी उपस्थित होते.
महाबळेश्वर व पाचगणी ही दोन्ही पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी शनिवारी सकाळपासून खुली करण्यात आली आहेत. प्रांताधिकारी संगीता राजापूरकर यांनी अनलॉकबाबत महाबळेश्वर येथील सविस्तर माहिती दिली. येथे येणाऱ्या पर्यटकांना कोरोनाची टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे. पर्यटकांकडे कोरोना टेस्टचा अहवाल असला तरी पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची पाचगणी येथील दांडेघर नाक्यावर रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात येणार आहे. ही चाचणी नकारात्मक येणाऱ्या पर्यटकांनाच पाचगणी-महाबळेश्वर पर्यटनाचा आनंद लुटता येणार आहे. तसेच बाजारपेठेतील दुकानदार, हॉटेल व्यावसायिक व कामगारांची दर दहा दिवसांनी कोरोना तपासणी बंधनकारक करण्याचा विचार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
महाबळेश्वर, पाचगणी पर्यटनस्थळे शनिवारपासून खुले करण्यात आल्यामुळे हाॅटेल व व्यापारी वर्गाकडून व्हाॅटस्ॲप व फेसबुकवर ऑनलाईन बुकिंग व महाबळेश्वर इज ओपन अशा लाखो छायाचित्रे समाजमाध्यमांवर फिरविली जात आहेत. यामध्ये महाबळेश्वर तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसात भिजण्याचा व गरमागरम मक्याच्या कणसाची चव चाखता येईल. पावसाळी पर्यटन मजा लुटण्यासाठी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी महाबळेश्वरमधील व्यापारी वर्ग, हाॅटेल व्यावसायिक यांनी नवी शक्कल लढविली आहे.