सातर गावात जगणं महाग, मरण स्वस्त!

By Admin | Updated: February 10, 2015 00:25 IST2015-02-09T21:08:03+5:302015-02-10T00:25:11+5:30

पाटण तालुका : रस्ता, स्मशानभूमी, वैद्यकीय सेवांची कमतरता; पाण्यासाठी रोजचीच पायपीट

Living in a small village is expensive, death is cheap! | सातर गावात जगणं महाग, मरण स्वस्त!

सातर गावात जगणं महाग, मरण स्वस्त!

सणबूर : वांग-मराठवाडी धरणाच्या एका टोकाला डोंगरदऱ्यात वसलेले पाटण तालुक्यातील सातर हे एक हजार लोकसंख्येचे गाव. या गावाअंतर्गत महाळुंगेवाडी, लखनवस्ती, धनगरवाडा, सुतारवाडा या वस्त्यांचा समावेश असून, या वाड्या अनेक सुविधांपासून वंचित आहेत. या वस्त्यांना विकास कशाला म्हणतात, याची अद्याप जाणीवच नाही. येथील लोक अद्यापही आदिवासींसारखे जीवन जगत आहेत. या गावाला पुढाऱ्यांनी निवडणुकीत फक्त आश्वासने दिली. प्रत्यक्षात मात्र कार्यवाही शून्य असल्याचे दिसते.सातर गावात जाण्यासाठी रस्ता नाही. अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमी नाही. शाळेच्या इमारतीची गैरसोय. जाण्या-येण्यासाठी रस्ता नाही. अशा एक नव्हे, तर अनेक सुविधांचा वानवा आहे. त्यामुळे येथील लोकांना जगणं महाग झालंय. स्मशानभूमी नसल्याने मृत्यूनंतरही मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. गावात स्मशानभूमी नसल्याने आपल्या शेतातच अंत्यसंस्कार करावा लागत आहे. स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध आहे. मात्र, शेड बांधण्यासाठी लोकप्रतिनिधी निधी देत नाहीत, असा ग्रामस्थांचा आरोप आहे. पावसाळ्यात एखादी व्यक्ती मयत झाली तर अंत्यसंस्कारासाठी पाऊस जाईपर्यंत ताटकळत बसावे लागते. विधीपूर्ण होऊपर्यंत त्याचठिकाणी थांबावे लागते.
गावात दळणवळणाची मोठी गैरसोय आहे. येण्या-जाण्यासाठी वाहतूक नसल्याने पाच ते सात किलोमीटर पायी चालतच प्रवास करावा लागतो. आजारी व्यक्तीला दवाखान्यात नेण्यासाठी आजही डोलीचा वापर करावा लागतो. याठिकाणी पहिली ते सातवीपर्यंत प्राथमिक शाळा आहे. मात्र, शाळेसाठी पुरेशी इमारत नाही. शिक्षकांची कमतरता असल्याने विद्यार्थ्यांची शैक्षणिक हेळसांड होत आहे. तसेच वर्षानुवर्षे भेडसावणारा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिकच गंभीर बनत चालला आहे. पिण्याचे पाणी ग्रॅव्हिटीद्वारे डोंगरातून पाईपलाईन करून गावात आणण्यात आले आहे. मात्र डोंगरात चरावयास गेलेल्या जनावरांमुळे पाईपलाईन सारखी फुटत असते. त्यामुळे पिण्याचे पाणी दूषित होण्याचे प्रकार घडतात. उन्हाळ्यात पिण्यासाठी लोकांना रात्रंदिवस डोंगर दऱ्यात भटकावे लागत असते. त्यातच जंगली जनावरांचा वाढता त्रासामुळे लोक हैराण होत आहेत. (वार्ताहर)


नेत्यांची आश्वासने निवडणुकापुरतेच
देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षे उलटून गेली. मात्र, आम्ही अजूनही पारतंत्र्यातच आहे. आम्ही आजही आदिवासींसारखे जीवन जगत आहे. गावात अनेक सुविधांचा वानवा आहे. लोकप्रतिनिधी निवडणुकीवेळीच मतासाठी गावात येतात, आश्वासने देतात; मात्र निवडणूक झाली की त्यांना त्याचा विसर पडतो.
- अंकुश साळुंखे, माजी सरपंच, सातर

Web Title: Living in a small village is expensive, death is cheap!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.