निर्जीव दगडात कोरली सजीवांमधली नाती!
By Admin | Updated: April 30, 2015 00:27 IST2015-04-29T23:21:30+5:302015-04-30T00:27:03+5:30
इतिहासाला उजाळा : गुलमोहर दिनी ‘शिल्पकलेतील निसर्ग’ सातारकरांच्या भेटीला; कार्यक्रमस्थळी उद्या छायाचित्रांचे प्रदर्शन

निर्जीव दगडात कोरली सजीवांमधली नाती!
सातारा : विकासाच्या उसन्या संकल्पनांनी पछाडलेला माणूस आज निसर्गाला ओरबाडत असला, तरी तो निसर्गाचाच एक छोटासा भाग असल्याची जाणीव त्याच्या हृदयात पहिल्यापासून आहे. सांस्कृतिक जडणघडणीच्या प्रत्येक टप्प्यात, प्रत्येक कलाप्रकारात ती पाहायला मिळालीय. शेकडो वर्षांपूर्वी निर्जीव दगडांवर कोरलेल्या शिल्पांमध्येही ती प्रतिबिंंबित झालीय. निसर्ग-मानव नात्याचा हा इतिहास शुक्रवारी सातारकरांना गुलमोहर दिनाच्या निमित्तानं पाहायला मिळणार आहे.
जुन्या दगडी चौकटींवर वेलीफुलांची नक्षी दिसते. मराठा शिल्पकला शैलीत मखरावर केळफूल दिसतं आणि चित्रांत डोकावतात पोपट. कुषाणकाळात कंधारमध्ये बौद्ध शैलीत कोरलेल्या बुद्धमूर्तीच्या डोक्यावर छाया धरणाऱ्या बोधीवृक्षाची पाने हलल्याचा भास होतो. कल्पवृक्ष म्हणजे पारिजात गरुडाने स्वर्गातून आणल्याची आख्यायिका कधी दगडी शिल्पातून दिसते तर कधी पहिली लेखनसामग्री म्हणून वापरलेलं भूर्जपत्रच शिल्प बनून जातं. कधी साक्षीदार म्हणून, कधी रक्षक म्हणून, कधी प्रतीक म्हणून तर कधी उपयोगी पडणारा मित्र म्हणून निसर्ग शिल्पकृतींमधून दिसतो.
प्रेमीयुगुलांच्या हृदयातील भावनांच्या छटाही पार्श्वभूमीला असलेल्या निसर्गातून प्रतीत होतात. पहिल्यावहिल्या प्रेमाची अभिव्यक्ती होत असताना पार्श्वभूमीला उमलू लागलेली कळी दिसते तर परिपक्व प्रेम शिल्पात येतं ते फळ धरलेल्या आम्रवृक्षाच्या पार्श्वभूमीवर. सांचीच्या स्तूपामधील शिल्पांमध्ये झाडावर माकडं दिसतात. पार्श्वभूमीला कमळं आणि बदकंही दिसतात. या शिल्पांमधलं प्रत्येक झाड वेगळं. तिथं नदीच्या पाण्यात मासे आणि मगरही दिसते. वृक्षपूजा करणारी माणसं दिसतात. ‘डालमालिका’ म्हणजेच आंब्याच्या फांदीला लोंबकाळणारी युवती दिसते. सहाशे वर्षांपूर्वीचं कोणतंही शिल्प पाहा, पार्श्वभूमीला किमान एक झाड दिसतंच. गुलमोहर दिनाच्या निमित्तानं ते अधोरेखित करण्याचा संयोजकांचा प्रयत्न आहे.
गुलमोहर दिनानिमित्त निसर्गाच्या जवळ जाण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन दरवर्षी केले जाते. निसर्गाशी पूर्वापार असलेले नाते लोक विसरत चालले असून, ते पुन्हा प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने करण्यात येणाऱ्या प्रयत्नांचा भाग म्हणून ‘शिल्पकलेतील निसर्ग’ हे छायाचित्रांचे प्रदर्शन यावर्षी आयोजित करण्यात आले आहेत. शिल्पांवरून इतिहासाचा शोध घेणाऱ्या जिज्ञासा ग्रुपने पुढाकार घेऊन दुर्मिळ शिल्पकलेची छायाचित्रे सातारकरांना पाहण्यास उपलब्ध करून देण्याचे ठरविले आहे. (प्रतिनिधी)
सातारा जिल्ह्यात तारळे गावातल्या शिल्पात चार हातांचा कृष्ण दिसतो. शंकराच्या डोक्यावरून वाहणाऱ्या गंगेतील मासे उलट दिशेनं पुन्हा शंकराकडे जाताना दिसतात. खिद्रापूरला पंचतंत्रातलं ‘बडबडकासव’ दिसतं. जातक कथांमधील मगरी, माकड, नाग-मुंगूस असे प्राणीही ठिकठिकाणच्या शिल्पांमधून निसर्गाशी माणसाचं असलेलं नातं सांगतात. हेच नातं शुक्रवारी या शिल्पांच्या छायाचित्रांमधून आम्ही सातारकरांसाठी उलगडणार आहोत.
- नीलेश पंडित, जिज्ञासा विचार मंच.
बदलत्या संकल्पनांचे प्रतिबिंंब
लक्ष्मी ऐश्वर्याचं प्रतीक मानली जाते. बाराशे वर्षांपूर्वी चालुक्य काळात पाऊस म्हणजे समृद्धी हे सूत्र असताना ती दोन हातांची ‘गजान्तलक्ष्मी’ होती. हत्ती हे इंद्राचं वाहन म्हणून पावसाचं प्रतीक. नंतर लक्ष्मीचं कमळ हे समृद्धीचं प्रतीक बनलं. सुदृढ अपत्य हीच खरी संपत्ती, असं यातून प्रतीत होतं. विशेष म्हणजे गौतम बुद्धही कमळावर विराजमान आणि ताजमहालावरही कमळाचं चिन्ह. काळाबरोबर बदलणाऱ्या संकल्पना निसर्गाच्या माध्यमातून अशा प्रकारे प्रतिबिंंबित झाल्या आहेत.