पशुधन रोडावल्याने दुग्धोत्पादन घटले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:43 IST2021-09-06T04:43:06+5:302021-09-06T04:43:06+5:30
कऱ्हाड : शेतकरी हा जगाचा पोशिंदा, पण सध्या हाच पोशिंदा लीटरभर दुधासाठी चक्क डेअरीसमोर रांगेत उभा राहतोय. दुभत्या जनावरांची ...

पशुधन रोडावल्याने दुग्धोत्पादन घटले!
कऱ्हाड : शेतकरी हा जगाचा पोशिंदा, पण सध्या हाच पोशिंदा लीटरभर दुधासाठी चक्क डेअरीसमोर रांगेत उभा राहतोय. दुभत्या जनावरांची संख्या घटल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असून, ढासळलेला दुधाचा खरेदी दर हे त्या पाठीमागील मुख्य कारण आहे.
ग्रामीण भागातील बहुतांश शेतकरी शेतीला जोडव्यवसाय म्हणून गाय, म्हैस पालन करतात. त्याद्वारे दुग्धोत्पादन करून आपली उपजीविका चालवितात. मात्र, दुधाच्या दराबाबत शासनाच्या चुकीच्या धोरणाचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे. दुधाला दर मिळत नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपली दुभती जनावरे विकली आहेत. परिणामी, दुधासाठी आता शेतकऱ्यालाच डेअरीच्या रांगेत उभे राहण्याची वेळ आली आहे. म्हैशीच्या दुधाला थोड्या-फार प्रमाणात दर मिळतो. मात्र, गाईच्या दुधाला गत काही वर्षांपासून अपेक्षित दरच मिळत नाही. पाण्याची बाटली २० रुपयांना मिळत असताना, गायीच्या दुधाला २२ ते २४ रुपये दर देणे, ही शेतकऱ्यांची थट्टाच म्हणावी लागेल. या चुकीच्या धोरणामुळे सध्या शेतकऱ्यांनी पशुधन विकण्यास सुरुवात केली आहे. गत काही वर्षांपासून शेतकऱ्यांनी पशुपालनच बंद केले आहे. परिणामी, दुग्धोत्पादनही घटले आहे. मात्र, तरीही दुधाला दर मिळत नसल्याची परिस्थिती आहे.
शासनाने दुध दर कमी केला असताना, खाद्याचे दर अव्वाच्या सव्वा वाढविले आहेत. त्यामुळे ज्यांच्याकडे दुभती जनावरे आहेत, त्यांना खाद्यासह इतर खर्च परवडत नाही. एकीकडे दुधाला दर नाही आणि दुसरीकडे पशुखाद्याचे दर वाढविण्यात आले. त्यामुळे दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी आपली दुभती जनावरे विकली आहेत.
- चौकट
कऱ्हाडातील दूध संघ
१) कोयना सहकारी दूध संघ
२) महाकाली दूध संघ
- चौकट
दररोजचे दूध संकलन
६०,००० लीटर : कोयना संघ
५,५०० लीटर : महाकाली संघ
- चौकट
संकलीत दुधापैकी
गाय दूध : ६२ टक्के
म्हैस दूध : ३८ टक्के
- चौकट
प्रतीलीटर खरेदी दर
गाय : २५/२६ रु.
म्हैस : ४१/४२ रु.
- चौकट
कऱ्हाड तालुक्यातील दुधाळ जनावरे
३४,६९६ : गाय
६९,४३३ : म्हैस
३०,९९७ : शेळी
१२,३९२ : मेंढी
- चौकट
दुधाळ जनावरे खरेदीसाठी अनुदान
- मराठवाडा पॅकेज
५० टक्के अनुदान
- विशेष घटक
७५ टक्के अनुदान
- चौकट
दुधाळ जनावरांमध्ये गाय, म्हैस
शेळी आणि मेंढीच्या दुधाचा काही कुटुंबांमध्ये वापर केला जात असला, तरी तो अत्यल्प आहे, तसेच पशुसंवर्धन विभागाच्या लेखी ही दोन्ही जनावरे दुभती मानली जात नाहीत. गाय आणि म्हैस या दोनच जनावरांना दुधाळ जनावरे म्हणून ओळखले जाते.
- चौकट
दुधाला अपेक्षित दर मिळत नसल्यामुळे जनावरे पाळण्याबाबत शेतकरी अनास्था दाखवित असल्याचे दिसते. दुधाळ जनावरांची संख्या वाढावी, यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी शासनाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत.
- डॉ.डी.व्ही. उंडेगावकर
पशुसंवर्धन अधिकारी, कऱ्हाड
फोटो : ०५केआरडी०२, ०३, ०४
कॅप्शन : प्रतीकात्मक