बिबट्याच्या हल्ल्याने पशुधन धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:29 IST2021-01-10T04:29:42+5:302021-01-10T04:29:42+5:30
मोरणा विभागातील नोटोशी, कुसरूंड, वाडीकोतावडे आणि आंब्रग ही सर्व गावे डोंगराच्या पायथ्याशी वसली आहे. गावातील लोकांचा प्रमुख व्यवसाय हा ...

बिबट्याच्या हल्ल्याने पशुधन धोक्यात
मोरणा विभागातील नोटोशी, कुसरूंड, वाडीकोतावडे आणि आंब्रग ही सर्व गावे डोंगराच्या पायथ्याशी वसली आहे. गावातील लोकांचा प्रमुख व्यवसाय हा शेती आहे. या गावातील सर्व पाळीव जनावरे चरण्यासाठी डोंगरावर नेली जातात. याबरोबरच मोरणा प्रकल्पामुळे नदीला पाणी असल्याने त्यावर चारही गावांतील लोकांकडून नदीकाठी बागायती शेती केली जात आहे. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून गायी-म्हशी, शेळीपालन करून दुग्धव्यवसायासारखे शेतीपूरक उद्योग सुरू केले आहेत; परंतु गेल्या काही महिन्यांपासून या विभागात बिबट्याच्या वावरामुळे शेती आणि पूरक व्यवसाय अडचणीत सापडले आहेत.
विभागात बिबट्याकडून केल्या जाणाऱ्या हल्ल्यांमुळे ग्रामस्थांत भीतीचे वातारण निर्माण झाले आहे. तसेच याचा फटका शेतीला बसत आहे. बिबट्याच्या भीतीने मजूर तसेच महिला शेतामध्ये काम करण्यास जाणे टाळत असून, सायंकाळी पाच वाजण्याच्या आतमध्ये घरी परतत आहेत. या विभागामध्ये ग्रामस्थांना वारंवार बिबट्याचे दर्शन होते. तसेच काही महिन्यांत अनेक जनावरांवर हल्ला करून त्याने त्यांचा फडशा पाडला आहे. जनावरे ठार केल्यानंतर वन विभाग त्याठिकाणी पंचनामा करतो. काही शेतकऱ्यांना त्याची नुकसान भरपाई मिळते. मात्र, नुकसान भरपाईपेक्षा बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त होणे गरजेचे आहे. वन विभागाने बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे.