केश कर्तनालय बंद असल्याने थोडी-थोडी दाढी ‘इन’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:42 IST2021-05-21T04:42:00+5:302021-05-21T04:42:00+5:30
सातारा : गालावर वाढलेले दाढीचे खुंट बघितले की घरातील ज्येष्ठांकडून ‘जावा जरा दाढी करून या, का असं मजनूसारखं फिरताय’ ...

केश कर्तनालय बंद असल्याने थोडी-थोडी दाढी ‘इन’!
सातारा : गालावर वाढलेले दाढीचे खुंट बघितले की घरातील ज्येष्ठांकडून ‘जावा जरा दाढी करून या, का असं मजनूसारखं फिरताय’ ही कमेंट अगदी ठरलेली. गालावर दाढी दिसू लागली की, लगेच चकाचक दाढी करून येण्याचे दिवस आता सरले आहेत. थोडी-थोडी दाढी वाढवून त्याचे मस्त सेटिंग करून मॅच्युअर दिसण्याचा नवा ट्रेन्ड सध्या तरुणाईमध्ये कोरोना काळात दिसत आहे. त्यामुळे पूर्वीची ‘वेल शेव्हड’ ही संकल्पना आता गायब होऊ लागली आहे.
कोविडची मगरमिठी घट्ट झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने केश कर्तनालये बंद ठेवण्याचा आदेश दिला. गेल्या दोन महिन्यांपासून हे सर्व बंद असल्याने तरुणाईला खुरट्या दाढीशिवाय पर्यायच राहिला नाही. पूर्वीची वेल शेव्हड आणि चकाचक लूक आता फॅशनच्या बाहेर गेला आहे. त्यामुळे तरुणांचा वर्ग मोठ्या प्रमाणावर खुरट्या दाढ्या वाढवत आहेत. कोविडने दिलेली ही स्टाईल तरूण आता दिमाखात मिरवू लागले आहेत.
दाढीची निगा राखण्यासाठी दिवसातील काही वेळ स्वतंत्रपणे काढावा लागत असला तरीही कोणत्याही ड्रेसकोडवर दाढी उत्तम दिसते, असे तरुणाईला वाटते. नोकरीच्या शोधात असलेले तरुण तर हमखास दाढी ठेवतात. ‘नोकरी देणारे तुमची मॅच्युअर पर्सनालिटी बघतात’ आणि दाढी हे मॅच्युरिटीचे लक्षण असल्याचे तरुणांना वाटते. त्यामुळे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या आणि विवाहाच्या उंबरठ्यावर असलेल्या तरुणांमध्ये दाढी वाढविण्याचे प्रकार जास्त आहेत.
चेहऱ्याची त्वचा टिकविण्यासाठी
केश कर्तनालय बंद असल्याने दाढी वाढविण्याशिवाय पर्याय नाही. अनेक तरुणांना दाढी केल्यामुळे चेहरा राठ होत असल्याचे जाणवते. त्यामुळे दाढी वाढवणं ही मुलं पसंत करतात. संपूर्ण गालावर दाढी येत नसेल तर फ्रेंच स्टाईल दाढी ठेवणंही मुलं पसंत करतात. काहीजण कापेल म्हणून गालाला ब्लेड लावत नाहीत. दाढी ट्रिम करणं आणि त्यावर वेगवेगळे लोशन लावून दाढी राखण्यात येते.
डोक्याच्या केसांपेक्षा दाढी महाग
डोक्यावरच्या केसांपेक्षा गालावरच्या दाढीला राखणं जास्त महाग पडतं. कमीत कमी पाच दिवसांतून एकदा दाढी ट्रिम करावी लागते. पंधरा दिवसांतून एकदा दाढीचे सेटिंग करावे लागते. दाढीचा शॅम्पू, दाढीचा ब्रश, तेल, कंगवा आदी अनेक प्रकार उपलब्ध आहेत. पन्नास मिलीलीटरसाठी तीनशे रुपयांपासून पुढे या लोशन्सची किंमत असते. कोविडमुळे दुकानं बंद असल्याने अनेकजण हे लोशन ऑनलाईन मागवतात.
दाढी अचूकच हवी !
दाढी ठेवायला पॅशन हवं असं तरुणाईचं म्हणणं आहे. त्यामुळे ज्यांना हे पॅशन आहे, असेच तरुण दाढी राखण्याचा विचार करतात. वरकरणी गाल झाकणारी दाढी एवढेच त्या दाढीचे महत्त्व नाही. प्रत्येकाच्या चेहऱ्याच्या ठेवणीनुसार ही दाढी असते. दाढी करताना एखादाही केस इकडे-तिकडे कापला गेला तर पूर्ण चेहऱ्याचा नूर जातो. डोक्यावरचे केस कापताना काही चूक झाली तर ती लपवणे सोपे असते; पण दाढीच्या बाबतीत चूक अमान्य आहे. म्हणूनच दाढी करण्यासाठी अनुभवी हातांवर तरुणाई विश्वास ठेवते.
कोट
महाविद्यालयीन शिक्षण संपवून नोकरीच्या शोधात असणाऱ्या शेकडो तरुणांना ‘जबाबदार’ दिसण्यासाठी दाढीचा आधार घ्यावा लागला आहे. दाढीमुळे तुम्ही वयापेक्षा तीन ते पाच वर्षे मोठे दिसता, असे त्यांचे मत झाले आहे. त्यामुळे नोकरी मिळविण्यासाठी आपण योग्य उमेदवार आहे, हे दर्शविण्यासाठी दाढी राखत आहे.
- रोहन यादव, मल्हार पेठ सातारा