जरंडेश्वरबाबत रस्त्यावर उतरुन ईडीला जिल्हाबाहेर काढू : शशिकांत शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:23 AM2021-07-22T04:23:59+5:302021-07-22T04:23:59+5:30

कोरेगाव : कोरेगावचा जरंडेश्वर हा जिल्ह्याची प्रमुख अर्थवाहिनी आहे. ५० हजार शेतकऱ्यांना न्याय देणारा, १५ लाख मेट्रिक टन ...

Let's take ED out of the district by taking to the streets about Jarandeshwar: Shashikant Shinde | जरंडेश्वरबाबत रस्त्यावर उतरुन ईडीला जिल्हाबाहेर काढू : शशिकांत शिंदे

जरंडेश्वरबाबत रस्त्यावर उतरुन ईडीला जिल्हाबाहेर काढू : शशिकांत शिंदे

Next

कोरेगाव : कोरेगावचा जरंडेश्वर हा जिल्ह्याची प्रमुख अर्थवाहिनी आहे. ५० हजार शेतकऱ्यांना न्याय देणारा, १५ लाख मेट्रिक टन गाळप करणारा, सातारा जिल्ह्याला आर्थिक उत्पन्न मिळवून देणारा, जिल्हा बँकेला ७ कोटींचा फायदा मिळवून देणारा, अनेकांचे संसार उभा करणारा हा कारखाना जर कुणाच्या राजकारणापायी बंद करण्याचा प्रयत्न झाला तर कायदेशीर लढाई तर आम्ही लढूच पण अतिरेक झाला तर प्रसंगी रस्त्यावर उतरून ईडीला जिल्हाबाहेर धाडण्याचे काम येथील शेतकरी करेल,’ असे आव्हान माजी जलसंपदा मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी दिले.

देऊर (ता. कोरेगाव) येथील मुधाई मंगल कार्यालयात जरंडेश्वर कारखाना ऊस उत्पादक शेतकरी मेळाव्यात आमदार शशिकांत शिंदे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे कृषी सभापती मंगेश धुमाळ, बिचुकले सरपंच प्रशांत पवार, माजी प्राचार्य गुलाबसिंग कदम, नीलेश जगदाळे, नरशिंग दिसले, शंकरराव कदम, रमेश कदम, सह्याद्री बँकेचे संचालक दिलीप कदम, गजानन मोरे, वैशाली सुतार, कविता देशमुख, राजेंद्र कदम, धनसिंग शिंदे, संदीप भोसले, नीलेश कदम उपस्थित होते.

आमदार शिंदे म्हणाले, जरंडेश्वर कारखान्याबाबत ईडीने कारवाई सुरू केली आहे. खरंतर ईडीने कायदेशीर मार्गाने ही लढाई सुरू ठेवावी. यात जे काही समोर येईल ते येईल पण कोणत्याही परस्थितीत हा कारखाना बंद ठेवू नये, यासाठीच हे जनजागृती आंदोलन सुरु आहे. सध्या जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात, गावागावात याबाबत मेळावे घेऊन त्यानंतर एक निवेदन ईडीला दिले जाईल. या निवेदनाबाबतीत सकारात्मक भूमिका दाखवली तर सहकार्य करू मात्र विरोध केला तर रस्त्यावर उतरून विरोध करु, ही भूमिका घ्यावी लागेल, असे आमदार शिंदे म्हणाले.

काहीही झालं तरी जरंडेश्वर चुकीच्या पध्दतीने बंद पडू देणार नाही, हा आमचा निर्धार आहे. हा कारखाना आजही सुरू आहे. तो सुरुच राहील पण जर कोणी याला टाळे ठोकण्यासाठी आलं तर ५० हजार शेतकऱ्यांच्या रोषाला त्यांना सामोरं जावं लागेल, अशी भूमिका आमदार शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.

एक साखर कारखाना बंद राहिला तर किती मोठे नुकसान होत, याची जाणीव आहे. हा कारखाना ज्यांच्यामुळे बंद झाला, त्यानंतर या कारखान्यासाठी अनेक व्यवस्था याठिकाणी आल्या त्यांनाही या लोकांनी हाकलून दिले. आज ही मंडळी दिल्लीला जाऊन आली. त्यांनी हा कारखाना ईडीने चालवावा, अशी भूमिका मांडली किंवा सक्षम माणसाला चालवण्यासाठी द्या, अशी मागणी दिल्लीत एका नेत्यांना केली. खरंतर ज्यांच्यामुळे या कारखान्याचा लिलाव झाला, ती मंडळी आज कारखाना परत मिळवण्यासाठी धडपडत आहेत. काहींनी तर कारखाना परत ताब्यात आल्याचा आनंद साखर वाटून साजरा केला.

अडीच हजार गाळप क्षमता असलेला जरंडेश्वर आज जिल्ह्यात सर्वाधिक साडेबारा हजार गाळप प्रतिदिन करत आहे. चांगला दर देण्याबरोबरच जिल्ह्यातील ५० हजार शेतकऱ्यांच्या ऊसाला समाधानकारक दर देत आहे. कामगारांना वेळेत पगार देत आहे, असं असताना चुकीच्या पध्दतीने हा कारखाना कोणी बंद पाडत असेल तर जशास तसे उत्तर देण्याची भूमिका घेतली जाईल.

प्रास्तविक शांताराम दोरके यांनी केले. प्रा. गुलाबसिंग कदम, सरपंच प्रशांत पवार, कृषी सभापती मंगेश धुमाळ यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रदीप कदम यांनी केले.

Web Title: Let's take ED out of the district by taking to the streets about Jarandeshwar: Shashikant Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.