सह्याद्रीतील रानमेवा लागला खुणावू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:38 IST2021-03-21T04:38:58+5:302021-03-21T04:38:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पेट्री झाडावर चढणं, काळी मैना, जांभळं, आंबुळगी, तोरणं, अस्सल रानमेवा खाणं खेड्यातील मुलांना सहज शक्य आहे; ...

Let's mark the legume of Sahyadri! | सह्याद्रीतील रानमेवा लागला खुणावू !

सह्याद्रीतील रानमेवा लागला खुणावू !

लोकमत न्यूज नेटवर्क

पेट्री

झाडावर चढणं, काळी मैना, जांभळं, आंबुळगी, तोरणं, अस्सल रानमेवा खाणं खेड्यातील मुलांना सहज शक्य आहे; पण शहरी संस्कृतीतून ते हद्दपार होऊ लागले आहे. कास, बामणोली, परिसरांत अंबुळगी पिकण्यास सुरुवात झाली असून सातारा, जावली तालुक्यातील दुर्गम भागातील शेतकऱ्यांकडून रानमेवा बाजारात काहीच दिवसात विक्रीसाठी दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सिमेंटच्या जंगलांतील मुलांची हौस फिटणार आहे.

जिल्ह्याच्या पश्चिम भागात रानमेवा मुबलक प्रमाणात उपलब्ध होऊ लागला आहे. या रानमेव्याचा आस्वाद पर्यटकांबरोबरच सातारा, महाबळेश्वरसारख्या बाजारपेठेत येणारेही उन्हाळ्यात घेत असतात. त्यामुळे स्थानिकांनाही रोजगार मिळतो.

जिल्ह्याच्या पश्‍चिम भागातील डोंगररांगांमध्ये पाटण, सातारा, जावळी, महाबळेश्वर तालुक्यांच्या पश्‍चिम घाट माथ्यावर तोरणे, आंबुळगी, करवंदे, जांभूळ, फणस, आंबा हा डोंगरातील रानमेवा दरवर्षीप्रमाणे मार्च महिन्यापासून मे ते जूनपर्यंत मुबलक प्रमाणात उपलब्ध होत असतो. हा रानमेवा बाजारपेठेत पर्यटकांचे लक्ष वेधून घेत असतो. परिसरात फिरावयास येणारे अनेक पर्यटक रानमेव्याचा आस्वाद घेताना दिसतात. वेली, झुडपात येणारे अंबुळगी हे फळ फेब्रुवारी-मार्चमध्ये पिकण्यास सुरुवात होते. त्यानंतर तोरणे, जांभूळ, करवंदे, फणस व आंबे या पिकांचा क्रमाने हंगाम सुरू होतो. तोरणे हे काटेरी झुडपाला येणारे एकबीजवर्गीय फळ. त्याची कच्ची फळेही येण्यास सुरुवात होत आहे. हे फळ पांढऱ्या रंगाचे असून चवीला गोड व साधारण तुरट असते. फळाचा आकार लहान मण्याएवढा असतो. तसेच अनेक ठिकाणी करवंदांना मोहर येऊन कच्ची करवंदे तयार होऊ लागली आहेत.

कोयनानगर, हेळवाक, नवजा तसेच सातारा तालुक्यातील ठोसेघर, परळी भाग, जावळी तालुक्यातील कास- बामणोली व महाबळेश्वर तालुक्याचा तापोळा, प्रतापगड या विभागांतील बहुसंख्य शेतकरी दरवर्षी उन्हाळ्यात आंबुळगी, तोरणे, करवंदे, जांभूळ यांच्या पाट्या भरून डोक्यावरून सातारा शहर व परिसरातील बाजारपेठेत विकतात.

चौकट

पारंबे फाटा ते एकीव मार्गावर काही ठिकाणी वणवा लागून बहुतांश अंबुळगी रानमेवा नष्ट झाला आहे. वणव्यामुळे रानमेवा नष्ट होऊन विक्रेत्यांना आर्थिक झळ पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे वणवा लागणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी.

कोट

अंबुळगी हे फळ काही प्रमाणावर पिकण्यास सुरुवात झाली आहे. निसर्गाने साथ दिल्यास रानफळे नक्कीच येथील स्थानिकांना चांगला रोजगार उपलब्ध करून देतील. तसेच वणवा लावू नये. वणव्याने हा सर्व रानमेवा नष्ट होऊ शकतो.

- विकास आखाडे, कुसुंबीमुरा

Web Title: Let's mark the legume of Sahyadri!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.