शेतात आढळला बिबट्या

By Admin | Updated: June 19, 2014 00:46 IST2014-06-19T00:40:56+5:302014-06-19T00:46:51+5:30

कऱ्हाड तालुक्यातील घटना : जखमी अवस्थेत वनविभागाने केले जेरबंद

Leopard found in the field | शेतात आढळला बिबट्या

शेतात आढळला बिबट्या

कऱ्हाड/मलकापूर : कऱ्हाड तालुक्यातील विंग येथे आज, बुधवारी दुपारी कणसे मळ्यातील उसाच्या शेतात बिबट्याची मादी आढळून आली. वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्याठिकाणी येऊन शिताफीने बिबट्याला जेरबंद केले. बिबट्या जखमी स्थितीत असल्यामुळे त्याच्यावर सुरक्षित ठिकाणी उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान, शेतामध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांना बिबट्या दिसल्यानंतर परिसरात काहीवेळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील विंग, येरवळे, चचेगाव परिसरात काही दिवसांपासून बिबट्यांचा वावर आहे. डोंगरानजीक शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना वारंवार बिबट्याचे दर्शन होते. कऱ्हाड-ढेबेवाडी मार्ग ओलांडत असताना अनेक वाहनधारकांच्या दृष्टीस बिबट्या पडला आहे. डोंगराच्या पायथ्याला काहीवेळा जनावरांवरही बिबट्यांनी हल्ले केले आहेत. या परिस्थितीमुळे शेतकरी शेतामध्ये जाण्यास घाबरत होते. अशातच विंग शिवारामध्ये बुधवारी बिबट्याची मादी आढळून आली.
विंग शिवारामध्ये शंकर कणसे यांची ऊस शेती आहे. आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास जयवंत कणसे व संतोष कणसे हे संबंधित शेतामध्ये गेले होते. त्यावेळी त्यांना बिबट्या दिसला. ऊसात बिबट्या असल्याचे निदर्शनास आल्यानंतर जयवंत व संतोष कणसे शेतामधून बाहेर पडले. त्यांनी याबाबतची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. माहिती मिळताच वनक्षेत्रपाल भरत पाटील, बी. के. जाधव, एस. जे. संकपाळ, बाबूराव पाटील, राजेंद्र सोनवणे, गवते, सागर कुंभार आदी वनकर्मचारी त्याठिकाणी दाखल झाले. त्यांनी काही अंतरावरूनच बिबट्याच्या हालचालींचे निरीक्षण केले.
त्यावेळी बिबट्या जखमी आणि उपाशीपोटी असल्याचे वनाधिकाऱ्यांना जाणवले. वनाधिकाऱ्यांनी शिताफीने त्याला पकडून पिंजऱ्यामध्ये घातले. परिस्थिती गंभीर असल्यामुळे तातडीने बिबट्याला कऱ्हाडच्या पशुवैद्यकीय रूग्णालयात आणण्यात आले. त्याठिकाणी उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला सुरक्षितस्थळी हलविण्यात आले.
बिबट्या अनेक दिवसांपासून उपाशी
बिबट्याची मादी दोन वर्षे वयाची असून अनेक दिवसांपासून ती उपाशी असावी. उपाशीपोटी असल्यामुळे ती मलूल झाली होती. कोणावरही हल्ला करण्याचे किंवा शिकार करण्याचेही तिच्यात त्राण नव्हते. शिकारीच्या प्रयत्नातच तिला जखमा झाल्या असण्याची शक्यता वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. गारवडे येथेही काही दिवसांपूर्वी जखमी बिबट्या आढळून आला होता. त्याला वाचविण्यात वनविभागाला अपयश आले होते.

Web Title: Leopard found in the field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.