वेणूताई चव्हाण कॉलेजमध्ये व्याख्यान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:38 IST2021-03-21T04:38:47+5:302021-03-21T04:38:47+5:30
कऱ्हाड : येथील वेणूताई चव्हाण महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी ऑनलाइन व्याख्यान आयोजित करण्यात आले ...

वेणूताई चव्हाण कॉलेजमध्ये व्याख्यान
कऱ्हाड : येथील वेणूताई चव्हाण महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी ऑनलाइन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. ज्येष्ठ लेखक, कवी व समीक्षक डॉ. सहदेव चौगुले-शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी शिवाजी शिक्षण संस्थेचे जनरल सेक्रेटरी प्रकाश पाटील होते. प्राचार्य जाधव यांनी प्रास्ताविक केले. केंगार यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. एस. पी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी मान्यवरांनी यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन केले. एस. आर. सरोदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
ढेबेवाडीत विविध उपक्रम उत्साहात (फोटो : २०इन्फो०१)
सणबूर : माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त ढेबेवाडी येथे विविध उपक्रम राबविण्यात आले. जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव अभिजीत पाटील, सरपंच अमोल पाटील, सतीश कापसे, उपसरपंच पोपटराव कळंत्रे, श्रीकांत आचरे, सुहासचंद्र पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष दादासाहेब साळुंखे, आनंदकुमार कांबळे, पाटण तालुका सोशल मीडियाप्रमुख मेघराज धस, दादासाहेब जाधव, संजय काळुगडे, सचिन देसाई, प्रतीक कोळेकर, विलास पाटील उपस्थित होते.
कऱ्हाडला लाल मातीची नियमबाह्य वाहतूक
कऱ्हाड : तालुक्यातील काही गावात लाल मातीची बेकायदा वाहतूक सुरू आहे. नियम धाब्यावर बसवून ही वाहतूक केली जात आहे. महसूल प्रशासनाने यामध्ये लक्ष घालून मातीचे बेकायदा उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. वीट भट्टीसाठी गाळाची माती वापरली जाते. नदीकाठच्या गावातून हा गाळ आणला जातो. मात्र, त्यासाठी महसूल विभागाकडून परवानगी घ्यावी लागते. मात्र, सध्या अनेक ठिकाणी नियमबाह्य उत्खनन व वाहतूक केली जात आहे.
उपमार्ग त्वरित दुरूस्त करण्याची मागणी
मलकापूर : येथे सेवा रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. महामार्गाच्या पूर्व बाजूकडील सेवा रस्त्यावर खुदाई करण्यात आल्यामुळे त्याची माती व खडी रस्त्यावर पसरून धोका निर्माण झाला आहे. रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी शिवसेनेचे नितीन काशीद यांनी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी रामभाऊ रैनाक, मधुकर शेलार, सूर्यकांत मानकर, नरेंद्र लोहार, सुभाष भिलवडे आदी उपस्थित होते.
पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले
कऱ्हाड : शहरात पालिकेमार्फत पाणी पुरवठा केला जातो. मात्र, काही दिवसांपासून रविवार पेठेत होत असलेल्या पाणी पुरवठ्याबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत. रविवार पेठेत काही दिवसांपासून पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले आहे. पूर्वी सकाळी सात व सायंकाळी सात वाजता पाणी येत होते. आता ते कधी आठ तर कधी नऊ वाजता येत आहे. पाण्यात क्लोरीनचे प्रमाण जास्त असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. याबाबत पालिकेने योग्य ती कार्यवाही करणे गरजेचे आहे.
कापीलला बुधवारी तैलचित्राचे अनावरण
कऱ्हाड : कापिल, ता. कऱ्हाड येथे गुरुवर्य भगवानमामा कराडकर यांच्या तैलचित्राचे अनावरण व हनुमान मंदिराचा वर्धापन दिन असा संयुक्त कार्यक्रम बुधवार २४ रोजी आयोजित केला आहे. भगवानमामा कराडकर यांनी मठामध्ये तब्बल ५५ वर्षे मठाधिपती म्हणून कार्य केले. वारकरी संप्रदायात त्यांना आदराचे स्थान आहे. या कार्यक्रमानिमित्ताने सकाळी ८ ते १२ या वेळेत वारकरी सांप्रदायिक कार्यक्रम व श्रीकांत पातकर यांचे कीर्तन होणार आहे.
मालोशीत रस्ता कॉंक्रिटीकरण सुरू
पाटण : जिल्हा परिषद सदस्या संगीता खबाले-पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून मालोशी, ता. पाटण येथील बौद्ध वस्तीत दलित सुधारणा योजनेअंतर्गत काँक्रिटीकरणाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच पाडेकरवाडी येथे लघुपाटबंधारे आडव्या पाठाच्या कामाचे भूमिपूजन खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष हनुमंतराव खबाले-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्य विलास देशमुख, सरपंच प्रकाश जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.