दोन वर्षांपासून ग्रामस्थांसह वाहतूकदारांच्या जीवाला घोर..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:39 IST2021-04-01T04:39:40+5:302021-04-01T04:39:40+5:30
वरकुटे-मलवडी : गेल्या आठ-दहा वर्षांपासून माण तालुक्यातील ढाकणी ते धामणी रस्त्याची दुरवस्था झाली असून, रस्ता एकीकडे तर खडी दुसरीकडे ...

दोन वर्षांपासून ग्रामस्थांसह वाहतूकदारांच्या जीवाला घोर..
वरकुटे-मलवडी : गेल्या आठ-दहा वर्षांपासून माण तालुक्यातील ढाकणी ते धामणी रस्त्याची दुरवस्था झाली असून, रस्ता एकीकडे तर खडी दुसरीकडे अशी दयनीय स्थिती निर्माण झाली आहे. पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून मंजूर असलेल्या रस्त्याचे चालू काम बंद ठेवून, ठेकेदारच पसार झाल्याने, दळणवळणाच्या दृष्टीने ग्रामस्थांसह वाहतूकदारांना गेल्या दोन वर्षांपासून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याने, ‘इधर चला मैंं, उधर चला.. जाने कहाँ मैं किधर चला..’ अशी अवस्था निर्माण झाली आहे.
ढाकणीपासून धामणीपर्यंत पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून सुमारे अडीच कोटी खर्चाचा आणि तीन किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षांपूर्वी आंबेकर कन्ट्रक्शनने सुरू केले होते.
रस्ता उकरून काही ठिकाणी मुरुम, खडी भरण्यात आली. मात्र, काही दिवसांनी रस्त्याकडेला ठिकठिकाणी टाकण्यात आलेली खडी उचलून दुसरीकडे हलविण्यात आली. तेव्हापासून ग्रामस्थ, वाहतूकदार, प्रवासी प्रत्येक दिवशी मरणयातना भोगत आहेत. बांधकाम विभागाच्या हालगर्जीपणामुळे संबंधित रस्ता करण्यासाठी ठेकेदाराने तब्बल दोन वर्षे एवढा अवधी लागूनही अद्याप पूर्ण करता आला नसल्याने, नागरिकांसह वाहतूकदारांची ससेहोलपट होत आहे. ढाकणी ते धामणी नव्याने तयार होणारा रस्ता पळशी फाट्याजवळ म्हसवड-दहिवडी मुख्य महामार्गाला जाऊन मिळत असल्याने,वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. गेली अनेक वर्षे या रस्त्याचे काम रखडल्याने नागरिक व वाहतूकदारांकडून संताप व्यक्त होत आहे.
कोट : पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून ढाकणी ते धामणी रस्ता मंजूर असून, दोन वर्षांपूर्वी सुरू असलेले काम सोडून ठेकेदार पसार झाला आहे. तेव्हापासून येथील ग्रामस्थ, शेतकरी मरणयातना भोगताहेत. रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी संबंधित विभागाला पत्र दिले आहे. लवकरात लवकर काम सुरू न झाल्यास ग्रामस्थांसह आंदोलन करूनच सोक्षमोक्ष लावला जाईल.
-दत्ताभाऊ शिंदे, सरपंच, ढाकणी ता. माण
३०वरकुटे मलवडी
माण तालुक्यातील ढाकणी ते धामणी रस्त्याची दुरवस्था झाली असून, रस्ता एकीकडे तर खडी दुसरीकडे अशी दयनीय स्थिती निर्माण झाली आहे.