सातारा: पाटण तालुक्यात पुन्हा भूस्खलन!, ग्रामस्थांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2022 04:20 PM2022-07-11T16:20:27+5:302022-07-11T16:23:17+5:30

डोंगराचा काही भाग रस्त्यावर घसरल्यामुळे परिसरातील काही वस्त्यांमधील ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले

Landslide again in Patan taluka satara district, evacuation of villagers to safer places | सातारा: पाटण तालुक्यात पुन्हा भूस्खलन!, ग्रामस्थांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर

छाया : नीलेश साळुंखे

googlenewsNext

कऱ्हाड/कोयनानगर : पाटण तालुक्यातील काठी-अवसरी परिसरातील खुडपुलेवाडी येथे जोरदार पावसामुळे भूस्खलन झाले. डोंगराचा काही भाग रस्त्यावर घसरल्यामुळे परिसरातील काही वस्त्यांमधील ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. प्रांताधिकारी सुनील गाढे यांनी घटनास्थळी भेट दिली.

दरम्यान, कऱ्हाड शहरासह तालुक्यात दोन दिवसांपासून पावसाची रिमझिम सुरू आहे. रविवारी दिवसभर पावसाने उसंत घेतली होती. त्यानंतर सायंकाळपासून पुन्हा मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झाली. तालुक्यात अद्यापही पावसाने जोर धरलेला नाही. अपेक्षित पाऊस पडत नसल्यामुळे शेतकरीही हैराण झाले असून, जमिनीतील ओलीवरच सध्या पेरणी, टोकणीची कामे उरकली जात आहेत.

पाटण तालुक्यातील खुडपुलेवाडी येथे भूस्खलन झालेल्या रस्त्यावरील वाहतूक काही कालावधीसाठी ठप्प झाली होती. त्यानंतर एका बाजूने वाहतूक सुरू करण्यात आली. तसेच शेजारील वस्तीतील ग्रामस्थांशी प्रांताधिकारी सुनील गाढे यांनी चर्चा केली. तसेच वरच्या भागात असलेल्या शेडमध्ये तात्पुरत्या स्वरूपात राहण्याबाबत व आवश्यक ती काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच संबंधित ग्रामस्थांपैकी चार ते पाच कुटुंबांना घरकुल मंजूर झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले असून, त्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना ग्रामसेवक व गटविकास अधिकाऱ्यांना प्रांताधिकारी गाढे यांनी दिल्या आहेत.

कऱ्हाड तालुक्यात गत आठवड्यापासून पावसाने सुरुवात केली आहे. मात्र, अद्यापही पावसाला जोर नाही. अधूनमधून कोसळणाऱ्या सरींमुळे ठिकठिकाणी पाणी साचून राहिले आहे. ओढे, नालेही अद्याप प्रवाहित झालेले नाहीत. मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे नदीपात्रातील पाण्याची पातळी काही प्रमाणात वाढली असली तरी शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. सध्या पडत असलेल्या पावसामुळे पिकांना दिलासा मिळाला आहे. तसेच पेरणी, टोकणीयोग्य ओलावा निर्माण झाल्यामुळे शेतकरी कामात व्यस्त असल्याचे चित्र शिवारात दिसून येत आहे.

Web Title: Landslide again in Patan taluka satara district, evacuation of villagers to safer places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.