शेतकऱ्यांना मिळणार उपलब्ध जमीन
By Admin | Updated: February 10, 2015 00:32 IST2015-02-09T21:50:28+5:302015-02-10T00:32:30+5:30
केसुर्डी औद्योगिक वसाहत : मकरंद पाटील यांच्या उपस्थितीत बैठक

शेतकऱ्यांना मिळणार उपलब्ध जमीन
सातारा : केसुर्डी, ता. खंडाळा येथील औद्योगिक वसाहतीसाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत, त्यापैकी बहुतांश शेतकऱ्यांना शासनाने पर्यायी जमिनी दिलेल्या नाहीत. या प्रश्नाबाबत आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली केसुर्डीतील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने सोमवारी (दि. ९) जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांची भेट घेऊन चर्चा केली. सुमारे दोन तास झालेल्या चर्चेतून जी जमीन उपलब्ध आहे, ती संबंधित शेतकऱ्यांना तत्काळ वाटप करण्याचा निर्णय झाला.
केसुर्डी येथे औद्योगिक वसाहतीसाठी शेतकऱ्यांची मोठी जमीन संपादित करण्यात आलेली आहे. या जमिनीपैकी १५ टक्के जमीन परतावा करणे बंधनकारक असतानाही शासनाने याबाबत निर्णय प्रलंबित ठेवल्याचे आमदार मकरंद पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर स्पष्ट केले. सुमारे २६७ शेतकऱ्यांचा हा प्रश्न असून, जमीन उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. सात-आठ वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या या प्रश्नामध्ये तत्कालीन पालकमंत्री रामराजे नाईक-निंबाळकर व जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी लक्ष घालून महामार्गालगतची जमीन या शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, जमीन उपलब्ध होऊ न शकल्याने जमिनीचे वाटप झाले नाही.
सेझ प्रकल्पातील मोठी जमीन शिल्लक आहे. ती जमीन औद्योगिक वसाहतीकडे वर्ग केल्यास शेतकऱ्यांचा प्रश्न मिटू शकतो, असे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले. दरम्यान, उपलब्ध जमिनीचे शेतकऱ्यांना वाटप करून हा प्रश्न मिटवावा, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रश्नात अभ्यास करून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, दि. ३ मार्च रोजी या संदर्भात बैठक घेण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)