सभासदांना मोफत साखर देणारा कृष्णा देशात एकमेव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:26 IST2021-06-17T04:26:24+5:302021-06-17T04:26:24+5:30
कराड, गेल्या निवडणुकीत सहकार पॅनेलने सभासदांना प्रतिशेअर दरवर्षी ६० किलो साखर देण्याचे आश्वासन दिले होते. हे मोफत साखरेचे अभिवचन ...

सभासदांना मोफत साखर देणारा कृष्णा देशात एकमेव
कराड,
गेल्या निवडणुकीत सहकार पॅनेलने सभासदांना प्रतिशेअर दरवर्षी ६० किलो साखर देण्याचे आश्वासन दिले होते. हे मोफत साखरेचे अभिवचन आमच्या संचालक मंडळाने पूर्ण केले असून, सभासदांना अशा प्रकारे मोफत साखर देणारा कृष्णा कारखाना देशात एकमेव असेल, असे प्रतिपादन यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी केले.
कराड तालुक्यातील अंबवडे, कोळे व आणे येथे जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्या प्रचारादरम्यान ते बोलत होते. याप्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप, उमेदवार सयाजी यादव, बबनराव शिंदे, माजी संचालक श्रीरंग देसाई, अजित खबाले, हेमंत पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. सुरेश भोसले म्हणाले, गेल्या सहा वर्षांत आम्ही शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर दिला आहे. सरासरी हा दर ३००० रुपये इतका आहे. आम्ही पारदर्शक व नियोजनबद्ध असा कारभार केला. कृष्णा कारखाना एक कुटुंब आहे, या विचाराने काम आम्ही केले. येत्या काळातही कृष्णा कारखाना शेतकरी सभासद हिताचे अनेक उपक्रम राबविणार आहे. तसेच कारखान्याची गाळपक्षमता ९००० मेट्रिक टनावरून १२,००० मेट्रिक टन वाढविण्याचा आमचा मानस आहे. जयवंत आदर्श योजना अधिकाधिक शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करणार आहे.
श्रीरंग देसाई म्हणाले, कृष्णा कारखान्याची निवडणूक ही आपल्या रोजच्या जगण्याशी निगडित आहे. या संस्थेचे आपल्याला दैनंदिन जीवनात मोठे सहकार्य लाभते. या भागाचा सर्वांगीण विकास कृष्णा कारखान्यामुळे व भोसले कुटुंबामुळे झाला आहे. त्यामुळे या भागातील सर्व सभासद सहकार पॅनेलच्या पाठीशी राहतील.
या वेळी दादासो कदम, जालिंदर कदम, नंदकुमार पाटील, जयवंत शेवाळे, विनोद पाटील, अंकुश कदम, संपत कदम, नारायण शेवाळे, महेंद्र साळुंखे, अशोक कांबळे, रमेश शेवाळे, राजाभाऊ कांबळे, सुरेश चव्हाण, भीमराव चव्हाण, अशोक कांबळे, अस्लम देसाई, पांडुरंग सावंत, महादेव कराळे, नाथा कराळे, राजेंद्र देसाई, शशिकांत तिरंगे, राहुल चव्हाण, युवराज कदम, सागर पाटील, किसन देसाई, शंकर पाटील, सदाशिव चव्हाण, सर्जेराव पाटील, सुभाष पाटील, सुरेश देसाई, संजय देसाई, चंद्रकांत देसाई, विकास देसाई, अधिक देसाई, आनंदराव देसाई, संभाजी देसाई, शंकर देसाई आदी उपस्थित होते.
फोटो ओळी :
आणे ता. कराड येथे जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्या प्रचार बैठकीत बोलताना डॉ. सुरेश भोसले.