‘एफआरपी’मध्ये ‘कृष्णा’ची आघाडी

By Admin | Updated: December 20, 2015 00:38 IST2015-12-20T00:37:11+5:302015-12-20T00:38:19+5:30

पंच्याऐंशी टक्के ‘एफआरपी’चा निर्णय : शेतकऱ्यांच्या खात्यावर आठवड्यात पैसे वर्ग

'Krishna' lead in 'FRP' | ‘एफआरपी’मध्ये ‘कृष्णा’ची आघाडी

‘एफआरपी’मध्ये ‘कृष्णा’ची आघाडी

कऱ्हाड : रेठरे बुद्रुक, ता. कऱ्हाड येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ‘एफआरपी’पैकी ८५ टक्के रक्कम चालू हंगामासाठी देण्याचा निर्णय कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी घेतला आहे.
राज्यभरात अनेक कारखाने ८० टक्के ‘एफआरपी’ देत असतानाच कृष्णा कारखान्याने मात्र सर्वाधिक ८५ टक्के ‘एफआरपी’ रक्कम जाहीर करून जिल्ह्यात आघाडी घेतली आहे. कारखाना आर्थिक अडचणीत असतानाही केवळ सभासदांचे हित लक्षात घेऊन संचालक मंडळाने हा निर्णय घेतल्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी सांगितले.
चालू गळीत हंगामातील उसासाठी ‘एफआरपी’ लवकरात लवकर मिळावी, अशी मागणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून शासनाकडे केली जात होती. शेतकऱ्यांच्या या मागणीची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी चालू हंगामात ८० टक्के ‘एफआरपी’ आणि हंगाम संपण्यापूर्वी उर्वरित २० टक्के ‘एफआरपी’ देण्याचा तोडगा सुचविला होता.
ऊस उत्पादकांनी हा तोडगा मान्य केल्याने साखर कारखानदार याबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. सातारा आणि सांगली जिल्ह्यांत काही कारखान्यांनी ८० टक्के ‘एफआरपी’ देण्याचा निर्णयही जाहीर केला; पण कृष्णा कारखान्याने मात्र सर्व साखर कारखान्यांत आघाडी घेत सर्वाधिक ८५ टक्के ‘एफआरपी’ चालू हंगामासाठीच देण्याचा निर्णय घेतला आहे. ८५ टक्केनुसार होणारी दोन हजार रुपये इतकी रक्कम येत्या आठवड्याभरात शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली जाणार असल्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी सांगितले.
दरम्यान, कारखान्याने ऊस विकास योजनाही जाहीर केली असून, त्याचा शेतकऱ्यांना चांगला लाभ होणार आहे. कारखान्याच ऊस विकास योजनेअंतर्गत चालू गळीत हंगामात २०१५-१६ आधी तुटलेल्या लागणीचा खोडवा ठेवणाऱ्या व राखणाऱ्या आणि त्याची नोंद कारखान्याकडे करणाऱ्या सभासदांना शेतीसाठी उपयुक्त गाळ शंभर टक्के अनुदानातून कारखाना साईटवरून देण्याची योजना आखण्यात आली आहे.
तसेच जे सभासद मोकळ्या जमिनीमध्ये नांगरणीपूर्वी गाळ टाकू इच्छितात, त्यांना प्रतीएकरी ५ ते १० मेट्रीक टनप्रमाणे प्रती मेट्रीक टन २०० रुपयेप्रमाणे अत्यल्प किंमतीत गाळ सभासदांना उधारीने उपलब्ध करून दिला जाणार आहे. तसेच बिगर सभासद शेतकऱ्यांना कारखाना साईटवरून प्रती मेट्रीक टन २०० प्रमाणे रोखीने हा गाळ उपलब्ध करून देण्यात ेयेणार असून, या योजनांचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन डॉ. सुरेश भोसले यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
 

Web Title: 'Krishna' lead in 'FRP'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.