कृष्णा महाविद्यालयाने साकारले ‘बोटॅनिकल गार्डन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:41 IST2021-02-09T04:41:22+5:302021-02-09T04:41:22+5:30

जयवंतराव भोसले यांचे निसर्गप्रेम व अतुलनीय शैक्षणिक कार्य याचे कायमस्वरूपी स्मारक म्हणून उद्यानाचे जयवंत बोटॅनिकल गार्डन असे नामकरण करण्यात ...

Krishna College launches 'Botanical Garden' | कृष्णा महाविद्यालयाने साकारले ‘बोटॅनिकल गार्डन’

कृष्णा महाविद्यालयाने साकारले ‘बोटॅनिकल गार्डन’

जयवंतराव भोसले यांचे निसर्गप्रेम व अतुलनीय शैक्षणिक कार्य याचे कायमस्वरूपी स्मारक म्हणून उद्यानाचे जयवंत बोटॅनिकल गार्डन असे नामकरण करण्यात आले आहे. कृष्णाचे हे गार्डन राज्यात बहुधा एकमेव असावे. सुमारे अडीच एकर क्षेत्र असणाऱ्या उद्यानामध्ये अर्बोरटम, हर्बल गार्डन, बटरफ्लाय गार्डन, ग्रासेस, सायक्याडस, बांबूसेटम, रॉकरी असे वनस्पतींचे विविध विभाग तयार करण्यात आलेले असून, त्यानुसार वनस्पती लावण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर ४० ते ८० वर्षापर्यंत जगणारा व जगातील सर्वात लांब फुलांचे तुरे येणारा सेंचुरी पाम, सुमारे दोन मीटरपर्यंत लांब शेंग असणारा महाकाय गारंबीचा वेल, रावण ताड म्हणून ओळखला जाणारा अत्यंत दुर्मीळ पाम, सीतेचा अशोक, चांदकोता, गोरख चिंच, नरक्या, पाडळ या दुर्मीळ तसेच वैशिष्ट्यपूर्ण असणाऱ्या वनस्पती तेथे वाढविण्यात आल्या आहेत.

गुगुळ, बेडकी, अनंतमूळ, भारंगी, चित्रक, मुरडशेंग, पांढरी गुंज, ज्योतिष्मती, दंती, सर्पगंधा, वायवर्णा, मोहा, अग्निमंथ, जीतसाया अशा दुर्मीळ तसेच अत्यंत उपयोगी असणाऱ्या ८० औषधी वनस्पतींचे उद्यानामध्ये संवर्धन करण्यात आले आहे. पाम या नारळ कुळातील वनस्पतींच्या सुमारे २४ प्रजाती उद्यानामध्ये असून, यामध्ये वेत, ऑइल पाम, बिस्मार्किया, शँपेन पाम या व इतर शोभीवंत प्रजाती वाढविण्यात आल्या आहेत. गवतांच्या सुमारे ३० प्रजाती आहेत व बांबूच्या नऊ प्रजातींचे संवर्धन करण्यात आले आहे तसेच पश्चिम घाटामध्ये आढळणाऱ्या दुर्मीळ व प्रदेशनिष्ठ असणाऱ्या सुमारे वीस वृक्षांच्या प्रजातींचा समावेश आहे. पाण्यातील वनस्पती वाढविण्यासाठी तळे तयार करण्यात आलेले आहे. यामध्ये कमळाचे विविध प्रकार लावण्यात आले आहेत.

- चौकट (फोटो : ०८केआरडी०४)

फुलपाखरू उद्यान ठरतंय आकर्षण

फुलपाखरू उद्यान हे या उद्यानाचे विशेष आकर्षण आहे. यामध्ये फुलपाखरू व मधमाश्या आकर्षित करणाऱ्या सुमारे ५० विशेष वनस्पतींच्या प्रजाती वाढविण्यात आल्या आहेत. पाच गुंठे क्षेत्रातील शेडनेटचा रोपनिर्मितीसाठी उपयोग केला जात आहे. उद्यानामध्ये गांडूळ खत प्रकल्प तयार करण्यात आला असून, मध संकलन करण्यासाठी विशेष पेट्या ठेवण्यात आल्या आहेत. मधुमक्षिकापालन, गांडूळ खतनिर्मिती, आळिंबी शेती याविषयीचे विशेष प्रशिक्षण उद्यानाच्या माध्यमातून देण्यात येत आहे. उद्यानाची स्वच्छता व देखभाल महाविद्यालयातील एनसीसी तसेच एनएसएसच्या विद्यार्थ्यांकडून केली जाते.

- चौकट

वनस्पतींचे अभ्यासक तसेच फार्मसी, पर्यावरणशास्र, वनविभाग, पर्यावरणप्रेमी यांनी अभ्यासासाठी उद्यानास भेट द्यावी. तसेच शाळा व महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थ्यांनी निसर्ग संरक्षण व दुर्मीळ वनस्पतींचे संवर्धन याविषयी उद्यानामध्ये भेटून राबविलेल्या उपक्रमांची माहिती घ्यावी.

- डॉ. सी.बी. साळुंखे, प्राचार्य

फोटो : ०८केआरडी०३

कॅप्शन : रेठरे बुद्रुक-शिवगनर, ता. कऱ्हाड येथील कृष्णा महाविद्यालयात बोटॅनिकल गार्डन साकारण्यात आली असून, याठिकाणी विविध प्रजातींच्या वनस्पतींचे संकलन व संवर्धन करण्यात आले आहे.

Web Title: Krishna College launches 'Botanical Garden'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.