कोयना, सह्याद्री अन् महालक्ष्मी एक्सप्रेसची सातारकरांना प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:25 IST2021-06-28T04:25:35+5:302021-06-28T04:25:35+5:30
लोणंद : देशभरात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असल्याने शासनाने अनलॉक सुरू केले आहे. त्यामुळे संचारबंदी हटवली असून, जिल्हा बंदीच्या ...

कोयना, सह्याद्री अन् महालक्ष्मी एक्सप्रेसची सातारकरांना प्रतीक्षा
लोणंद : देशभरात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असल्याने शासनाने अनलॉक सुरू केले आहे. त्यामुळे संचारबंदी हटवली असून, जिल्हा बंदीच्या अटीही शिथील केल्या आहेत. सार्वजनिक प्रवासाला परवानगी दिलेली असल्याने रेल्वे सुरू झाली आहे. मात्र, अद्यापही कोयना, सह्याद्री, महालक्ष्मी एक्सप्रेस सुरू झालेली नाही. त्यामुळे या गाड्या कधी सुरू होतात, याकडे लक्ष लागले आहे.
साताऱ्यातील हजारो तरुण सैन्यदलात कर्तव्य बजावत आहेत. मात्र, कोरोनानंतर जिल्ह्यात केवळ तीनच एक्सप्रेस थांबत आहेत. त्यामुळे मोठी गैरसोय होत आहे. सातारा जिल्ह्यातील प्रत्येक गावातून तरुण देशसेवा बजावत आहेत. ते वर्षातून एक महिना गावी येतात. यासाठी शक्यतो एप्रिल, मे महिन्यात सुटी घेतली जाते. ही सुटी संपवून ते परतीच्या मार्गावर आहेत. मात्र, सातारा जिल्ह्यातील रेल्वे स्थानकात थांबणाऱ्या अनेक महत्त्वाच्या एक्सप्रेस सुरू नाहीत. त्यामुळे मोठा खोळंबा होत आहे. या गाड्या कधी सुरू होणार, याकडे लक्ष लागले आहे.
चौकट
सध्या सुरू असलेल्या रेल्वे गाड्या
महाराष्ट्र एक्सप्रेस
गोवा एक्सप्रेस
अजमेर गरीब नवाझ एक्सप्रेस
चालुक्य एक्सप्रेस
दादर सेंट्रल फेस्टिव्हल
चौकट २
या गाड्या कधी सुरू होणार?
मुंबई-कोल्हापूर कोयना एक्सप्रेस
मुंबई-कोल्हापूर सह्याद्री एक्सप्रेस
मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस
पुणे-सातारा डेमू
कोल्हापूर-पुणे डेमू
चौकट ३
गर्दी टाळण्यासाठी पॅसेंजरला लाल दिवा
कोरोनाबाधितांची संख्या कमी झालेली असली तरी धोका कमी झालेला नाही. एक्स्प्रेसच्या तुलनेत पॅसेंजर गाड्यांचे तिकीट फारच कमी असते. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी पॅसेंजर कमी दरात प्रवास करण्यासाठी सोयीची असते. त्यामुळे मोठी गर्दी होते. पाय ठेवण्यासाठीही जागा मिळत नाही. त्यामुळे कोरोना आणखी वाढू शकतो. त्यामुळे पॅसेंजरला अजूनही लाल दिवाच दाखविण्यात आला आहे.
कोट
व्यापाऱ्यांसाठी दररोन ये-जा करण्यासाठी तसेच पुण्याहून मालाची ने-आण करण्यासाठी डेमू ट्रेन आणि सह्याद्री व कोयना एक्सप्रेस या गाड्या लवकरात लवकर सुरू करण्यात याव्यात. आम्हाला तीनशे ते चारशे रुपये मासिक पासवर या गाड्यांतून महिनाभर प्रवास करता येतो.
- प्रसन्ना शहा, व्यापारी, लोणंद
कोट
साताऱ्यापासून रेल्वे स्थानक लांब असले तरी परराज्यात जाण्यासाठी एस. टी.पेक्षा रेल्वे परवडते. तसेच लांबचा प्रवास कंटाळवाणाही होत नाही. त्यामुळे रेल्वे सुरू होणे गरजेचे आहे. सध्या रेल्वे सुरू असल्या तरी साताऱ्यातील प्रवाशांना त्यांचा फारसा फायदा होत नाही.
- प्रशांत नागुरे, सातारा.
फोटो २७लोणंद-ट्रेन
लोणंद रेल्वे स्थानकात गेल्या काही दिवसांपासून शुकशुकाट जाणवत आहे.