कोयना धरण काठोकाठ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:38 IST2021-09-13T04:38:37+5:302021-09-13T04:38:37+5:30
सातारा : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरण व परिसरात पाऊस सुरूच असल्याने रविवारी सायंकाळच्या सुमारास साठा १०४ टीएमसीजवळ ...

कोयना धरण काठोकाठ !
सातारा : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरण व परिसरात पाऊस सुरूच असल्याने रविवारी सायंकाळच्या सुमारास साठा १०४ टीएमसीजवळ पोहोचला होता. त्यातच धरणसाठा काठाजवळ आल्याने पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी सर्व सहा दरवाजे अडीच फुटांपर्यंत उघडण्यात आले. यामुळे दरवाजे व पायथा वीजगृह असा मिळून २३७८० क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे.
जिल्ह्यात जुलै महिन्याच्या मध्यावर जोरदार पाऊस झाला होता. त्यावेळी पश्चिम भागात धुवाँधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. अवघ्या तीन दिवसांत कोयना, नवजा आणि महाबळेश्वरला विक्रमी पाऊस झाला होता. त्याचबरोबर कोयना धरणात इतिहासात प्रथमच मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झालेली. कोयना धरणात २४ तासांत १६ टीएमसीने पाणीसाठा वाढला होता तसेच इतर धरणांतही पाणी वेगाने वाढलेले. मात्र, ऑगस्ट महिन्यात एकदम कमी प्रमाणात पाऊस पडला. त्यामुळे धरणे पूर्णपणे भरलीच नाहीत तर पूर्वेकडे खरीप हंगामातील पिके पावसाअभावी वाळू लागली होती. पण, गेल्या १० दिवसांपासून संपूर्ण जिल्ह्यात पावसाळी वातावरण तयार झाले आहे तसेच अनेक ठिकाणी दमदार पाऊस होत आहे.
जिल्ह्यातील पश्चिम तसेच पूर्वभागातही पाऊस होत असल्याने पिकांना फायदा झाला आहे तर पूर्व दुष्काळी भागातील माण, खटाव, फलटण तालुक्यात अनेक ठिकाणी चांगला पाऊस पडत आहे. कोरेगाव, खंडाळा, कऱ्हाड, वाई, जावळी तालुक्यातही पावसाची हजेरी आहे. त्यामुळे पिकांना फायदा झाला. त्याचबरोबर माण, खटाव तालुक्यातील अनेक गावांच्या ओढ्यांना पाणी येऊ लागले आहे तसेच बंधाऱ्यात पाणीसाठा होत आहे तरीही अजून मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम राहणार आहे.
जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरुच आहे. त्यामुळे प्रमुख धरणांतील पाणीसाठा वेगाने वाढत चालला आहे. १०५.२५ टीएमसी पाणी साठवण क्षमता असणाºया कोयना धरणात रविवारी सकाळच्या सुमारास १०३.१९ टीएमसी पाणीसाठा झाला होता. त्यातच धरणात ३० हजार क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू होती. त्यामुळे धरण व्यवस्थापनाने पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. दुपारी दोनच्या सुमारास धरणाचे सर्व सहा वक्र दरवाजे एक फुटाने उचलून पाणी सोडण्यात आले. तसेच पायथा वीजगृहाचे एक युनिट सुरू करुन तेथूनही विसर्ग सुरू करण्यात आला. त्यामुळे दरवाजातून ९२१४ आणि पायथा वीजगृह १०५० असा एकूण १०२६४ क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू होता. मात्र, सायंकाळी पाचच्या सुमारास धरणातून विसर्ग वाढविण्यात आला.
सायंकाळी धरणात १०३.९५ टीएमसी पाणीसाठा झाला होता तर धरणात २३७८० क्यूसेक पाण्याची आवक होत होती. धरण भरण्यासाठी सवा टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे पण, पाऊस असल्याने पाण्याची आवक होतच आहे. त्यामुळे धरण व्यवस्थापनाने सायंकाळी सर्व सहा दरवाजे एकवरून अडीच फुटांपर्यंत वर उचलले. त्यामधून २२७३० आणि वीजगृहातून १०५० असा एकूण २३७८० क्यूसेक पाणी विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू करण्यात आला होता. त्यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.
चौकट :
महाबळेश्वरला १०७ मिलीमीटर पाऊस...
जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला आहे. रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ५४ मिलीमीटर पाऊस पडला तर जूनपासून आतापर्यंत ३९८२ मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे तसेच नवजा येथे ४८ आणि आतापर्यंत ५२२२ व महाबळेश्वरला १०७ तर यावर्षी आतापर्यंत ५२९२ मिलीमीटर पाऊस झालेला आहे. त्याचबरोबर धोम, कण्हेर, उरमोडी, बलकवडी, तारळी या धरणांत समाधानकारक पाणीसाठा झालेला आहे.
............................................................