फलटण : फलटण तालुक्यासह शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना शहरातील मलठण परिसरात कोविड केअर सेंटर उभारण्यात येणार आहे. नगरसेवक अशोकराव जाधव यांचा पुढाकारातून व श्री कृपा सिंधू स्वामी समर्थ सेवा मंडळ, मलठण यांच्या माध्यमातून येथील स्वामी समर्थ मंदिर येथे कोविड केअर सेंटर उभे राहत आहे.
कोविड सेंटरमध्ये एकूण ५० बेड तयार करण्यात येणार असून यापैकी ५ बेड ऑक्सिजनचे असणार आहेत. बेडसह सर्व मूलभूत सुविधा अशोकराव जाधव व श्री कृपा सिंधू स्वामी समर्थ सेवा मंडळ यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. उपचारासाठी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी प्रशासनाने उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांच्याकडे करण्यात आली आहे. सध्या कोविड केअर सेंटर उभारणीचे काम वेगाने सुरू असून लवकरच हे काम मार्गी लागेल, असा विश्वास नगरसेवक अशोकराव जाधव यांनी व्यक्त केला.