जानकर जिल्ह्यातील तेरावे आमदार!
By Admin | Updated: January 20, 2015 23:43 IST2015-01-20T21:24:01+5:302015-01-20T23:43:13+5:30
घटक पक्षाला न्याय : हक्काचा ‘लाल दिवा’ मिळण्याची शक्यता बळावली

जानकर जिल्ह्यातील तेरावे आमदार!
सातारा : राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी विधानपरिषदेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महायुतीतल्या जागावाटपाच्या समन्वयामुळे जानकर आमदार होणार, हे निश्चित असल्याने सातारा जिल्ह्याच्या आमदारांचा आकडा आता तेरा होणार आहे.जिल्ह्यात सद्यपरिस्थितीत विधानसभेचे आठ आणि विधानपरिषदेचे तीन आमदार आहेत. विधानसभेला राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे (कोरेगाव), शिवेंद्रसिंहराजे भोसले (सातारा-जावळी), मकरंद पाटील (वाई-खंडाळा-महाबळेश्वर), दीपक चव्हाण (फलटण), बाळासाहेब पाटील (कऱ्हाड उत्तर) हे पाच आमदार, तर काँगे्रसचे पृथ्वीराज चव्हाण (कऱ्हाड दक्षिण), जयकुमार गोरे (माण-खटाव) हे दोन आमदार व शिवसेनेचे शंभूराज देसाई (पाटण) हे एकमेव आमदार असे बलाबल आहे. तर विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीचे रामराजे नाईक-निंबाळकर, प्रभाकर घार्गे, नरेंद्र पाटील व काँगे्रसचे आनंदराव पाटील हे जिल्ह्याच्यावतीने प्रतिनिधीत्व करत आहेत.शिवसेनेने पुरंदचे आमदार विजय शिवतारे यांना जिल्ह्याचे पालकमंत्रिपद दिल्याने सध्याच्या परिस्थितीत शिवतारेंचा वारु वेगात आहे. आमदार शंभूराज देसाई यांना शिवतारेंचे पाठबळ लाभले असल्याने सध्या काँगे्रस व राष्ट्रवादीच्या दहा आमदारांविरोधात शिवसेनेच्या या दोन धुरंधरांची राजकीय कुस्ती लागलेली पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादी व काँगे्रसची शक्ती मोठी असतानाही राज्य व केंद्रातील सत्तेमुळे पालकमंत्री विजय शिवतारे व आमदार शंभूराज देसाई यांनी जिल्हयावर वचक मिळविण्याची रणनीती आखली आहे. साताऱ्याचा अभिनव विकास करुन दाखविणार, हे वाक्य शिवतारे यांनी घोटून घेतले असल्याने साहजिकच जिल्ह्यात होणाऱ्या कार्यक्रमांत ते वारंवार या वाक्याचा वापर करत आहेत. दरम्यान, कोयना प्रकल्पातील वाढीव वीज निर्मिती, शासकीय मेडिकल कॉलेज व जिहे-कटापूर पाणी योजना पूर्ण करण्याचा पालकमंत्र्यांचा निर्धार दिसत आहे. दरम्यान, या परिस्थितीमध्ये महादेव जानकर यांना विधानपरिषदेमार्फत मंत्रिपदाची संधी मिळणार असल्याने जिल्ह्यात महायुतीची ताकद वाढणार आहे. याचा फायदा जिल्ह्याला भविष्यात नक्की होईल, असे चित्र सध्या तरी निर्माण झालेले आहे. (प्रतिनिधी)
अंगणात मंत्रिपद...शिवारात पाणी!
महायुतीतील घटक पक्ष म्हणून ‘रासप’ला हक्काचे मंत्रिपद मिळणार आहे. साहजिकच महादेव जानकरांच्या रुपाने माण-खटावच्या अंगणात मंत्रिपद चालून आल्याने आता शिवारातही पाणी खेळेल, अशी आशा दुष्काळग्रस्तांमध्ये निर्माण झाली आहे.