वाठार स्टेशन : कोरेगाव तालुक्यात राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या व सर्वात मोठी असलेल्या सातारारोड-पाडळी येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी आमदार महेश शिंदे पुरस्कृत जरंडेश्वर ग्रामविकास पॅनेलचे किशोर संपत फाळके यांची व उपसरपंचपदी याच पॅनेलचे प्रताप सुधीर पवार यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली आहे.
कोरेगाव तहसीलदारांच्या आदेशानुसार येथील ग्रामपंचायत कार्यालयात नूतन सरपंच व उपसरपंच निवडीसाठी मंगळवारी नवनिर्वाचित सदस्यांची बैठक बोलविण्यात आली होती. निवडणूक अध्यासी अधिकारी म्हणून तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय मांढरे यांनी काम पाहिले. त्यांना सहायक अधिकारी पी. ए. चव्हाण, ग्रामविकास अधिकारी डी. एल. सुरवसे, गावकामगार तलाठी प्रशांत पवार यांनी सहकार्य केले. सरपंचपदासाठी व उपसरपंचपदासाठी विहित वेळेत प्रत्येकी एकच नामनिर्देशनपत्र दाखल झाले होते. छाननीनंतर दोन्ही अर्ज वैध ठरल्याने व सरपंचपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव असल्याने नवनिर्वाचित सदस्यांचे बैठकीत दुपारी २ वाजता अध्यासी अधिकाऱ्यांनी सरपंचपदी किशोर फाळके व उपसरपंचपदी प्रताप पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याचे जाहीर केले.
यावेळी १७ पैकी १२ सदस्य उपस्थित होते. निवडीचेवेळी सभागृहात जरंडेश्वर ग्रामविकास पॅनेलचे किशोर फाळके, प्रताप पवार, विजय राऊत, प्रेमा सुतार, वंदना फाळके, संगीता रावण, सोनाली फाळके, साधना कांबळे, संगीता गाढवे, हेमा राजमाने, कांचन दीक्षित व अपक्ष वैभव घाडगे उपस्थित होते. महाविकास आघाडीचे सदस्य फिरकले नाहीत. नूतन सरपंच किशोर फाळके व उपसरपंच प्रताप पवार यांचे आमदार महेश शिंदे, माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश फाळके, रत्नदीप फाळके, प्रदीप फाळके, राजेश फाळके, अभिजित गाढवे, अजित फाळके, प्रवीण फाळके, केशव फाळके, काका पवार, संजयआबा फाळके, कुमार फाळके आदींनी कौतुक केले.
२४किशोर फाळके
२४प्रताप पवार