गोपूज-वडूज फरशी पुलावर खड्ड्यांचे साम्राज्य!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:36 IST2021-03-24T04:36:55+5:302021-03-24T04:36:55+5:30
औंध : प्रमुख रहदारीचा असणाऱ्या गोपूज-वडूज राज्यमार्गावरील फरशी पुलावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या पुलासह रस्त्याचे काम कधी ...

गोपूज-वडूज फरशी पुलावर खड्ड्यांचे साम्राज्य!
औंध : प्रमुख रहदारीचा असणाऱ्या गोपूज-वडूज राज्यमार्गावरील फरशी पुलावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या पुलासह रस्त्याचे काम कधी सुरू होणार याकडे वाहनधारकांचे लक्ष लागून राहिले आहे.
या रस्त्यावर अनेक खड्डे पडले असून गोपूज नजीकच्या फरशी पुलात तर मोठ-मोठे खड्डे पडल्याने किरकोळ पावसातही त्यास डबक्याचे स्वरूप येत आहे.
खटाव तालुक्यात मंगळवारी पहाटे झालेल्या पावसाने फरशी पूल जलमय झाला आहे. त्यामुळे ये-जा-करताना वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. सध्या महाराष्ट्रात सगळीकडे रस्त्याची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. अपघात टाळण्यासाठी रस्त्यांची कामे, रूंदीकरण यासाठी युद्धपातळीवर यंत्रणा कार्यान्वित आहे. परंतु हा रस्ता एका बाजूला कऱ्हाड, कोल्हापूरला जोडत आहे तर दुसरीकडे पंढरपूर, सोलापूर, नातेपुतेकडे जात आहे. मात्र, प्रचंड वाहतूक व रहदारी असणाऱ्या या रस्त्याचे काम कधी होणार याची प्रतीक्षा लागून राहिली आहे.
खटाव तालुक्यातील ऊस येथील तीन कारखान्यांसह इतर तालुक्यांतील कारखान्यांना पुरवठा याच मार्गावरून केला जात आहे. या रस्त्यावरून अनेक अवजड वाहनांची सतत वर्दळ आहे. त्यामुळे प्रत्येकवेळी नुसते खड्डे भरून मलमपट्टी करून चालणार नाही. रोज धावणारी वाहनसंख्या लक्षात घेता रस्त्याचे दर्जेदार काम होणे आवश्यक आहे.
प्रतिक्रिया
शासनाने या प्रमुख रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करणे आवश्यक आहे. या खड्ड्यांमुळे अनेकांना दुखापत झाली आहे. वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असल्याने रस्त्यांची डागडुजी वेळेवर होणे गरजेचे आहे.
- सरिता सुरेश घार्गे.
सरपंच गोपूज.
२३अौंद-पूल
गोपूजजवळ मंगळवारी पहाटे झालेल्या हलक्या स्वरूपाच्या अवकाळी पावसाने फरशी पूल जलमय झाला आहे. त्यामुळे वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. (छाया : रशिद शेख)