शिरवळजवळ युवक ठार
By Admin | Updated: January 29, 2015 00:13 IST2015-01-28T21:55:40+5:302015-01-29T00:13:38+5:30
दुचाकीचा अपघात : महामार्ग ओलांडणाऱ्या पादचाऱ्यासह दोघेजण जखमी

शिरवळजवळ युवक ठार
शिरवळ : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील शिरवळ, ता. खंडाळा गावच्या हद्दीत शिर्के कंपनीसमोर दुचाकीचा ताबा सुटल्याने महामार्ग ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला धडक बसली. या अपघातात मोटारसायकलचालक ठार तर पादचाऱ्यासह अन्य एकजण जखमी झाला आहे. आशिष हिंदुराव खैरे (वय ३५, रा. खमलेहट्टी, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) असे ठार झालेल्या चालकाचे नाव आहे.
याबाबतची शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पुणे या ठिकाणी एक खासगी कंपनीत कामाला असणारे आशिष खैरे हे आपल्या गावातील मित्र व पुणे या ठिकाणी फॅब्रिकेशनचा व्यवसाय करणारे संजय कुरळे यांच्यासमवेत गावावरून पुणेला जाण्यासाठी मोटारसायकलवरून (एमएच १२ केएम १८३५) निघाले होते. दरम्यान, मोटारसायकल पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील शिरवळ, ता. खंडाळा गावच्या हद्दीतील शिर्के कंपनीसमोर आली. त्यावेळी मोटारसायकल भरधावपणे चालली होती. यादरम्यान दुचाकीवरील ताबा सुटल्याने राष्ट्रीय महामार्ग ओलांडणारा पादचारी रविंद्र दत्तात्रय मगर (वय २६ रा. शिरवळ, ता. खंडाळा) याला धडक बसली. दुचाकीच्या या अपघातामध्ये तिघेही गंभीर जखमी झाले. गंभीर जखमी असणाऱ्या आशिष खैरे यांना शिरवळ येथीलच एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
दरम्यान, आशिष खैरे यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन शिरवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आले. त्यानंतर त्यांचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.या अपघाताची नोंद खंडाळा पोलीस ठाणे अंकित शिरवळ पोलीस दूरक्षेत्रात झाली आहे. दूरक्षेत्राचे सहायक फौजदार रफिक पटेल हे अधिक तपास करीत आहेत, असे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)