खवय्ये हॉटेलात; वाहने रस्त्यावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:04 IST2021-01-08T06:04:29+5:302021-01-08T06:04:29+5:30

शामगाव : कऱ्हाड-पुसेसावळी मार्गावर रस्त्यालगत असलेल्या हॉटेल व नाष्टा सेंटरवरील ग्राहक आपली वाहने रस्त्यावर उभी करत आहेत. त्यामुळे ...

At the Khawaiye Hotel; Vehicles on the road! | खवय्ये हॉटेलात; वाहने रस्त्यावर!

खवय्ये हॉटेलात; वाहने रस्त्यावर!

शामगाव : कऱ्हाड-पुसेसावळी मार्गावर रस्त्यालगत असलेल्या हॉटेल व नाष्टा सेंटरवरील ग्राहक आपली वाहने रस्त्यावर उभी करत आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण होत असून संबंधितांवर कारवाई होणे गरजेचे आहे.

कऱ्हाड ते पुसेसावळी हा मार्ग वर्दळीचा आहे. याच मार्गावर पुढे दहिवडी व पंढरपूर असल्यामुळे वाहतूक रात्रंदिवस दाट असते तसेच येथे घाट परिसर आहे. वेडीवाकडी वळणे आहेत. परिणामी या मार्गावर लहान-मोठ्या अपघातांची मालिका सुरूच असते. त्यातच ठिकठिकाणच्या हॉटेलसमोरील पार्किंगची भर पडत आहे.

या मार्गावर पुसेसावळीपर्यंत अनेक हॉटेल व नाष्टा सेंटर आहेत. करवडी, वाघेरी फाटा, चिंचमळा, बोरजाई मळा, शामगाव घाट, घाटमाथा, धाकुबाई खिंड आदी ठिकाणी हॉटेल व नाष्ट्याची सोय आहे. संबंधित हॉटेल व नाष्टा सेंटर रात्री नऊ वाजेपर्यंत सुरू असतात. येथे येणाऱ्या ग्राहकांना वाहने उभी करण्यासाठी जागा नाही. त्यामुळे ग्राहक वाहने रस्त्यावरच पार्क करून हॉटेल आणि नाष्टा सेंटरमध्ये खाद्यपदार्थांवर ताव मारत असतात. परिणामी, वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. अपघाताची शक्यताही निर्माण होते.

हा विभाग मसूर पोलीस दूरक्षेत्राच्या हद्दीत येतो. त्यामुळे पोलिसांनी संबंधित हॉटेलचालकांना याबाबत सूचना देण्याची मागणी होत आहे.

- चौकट

रात्री धोका अधिक

या मार्गावर ठिकठिकाणी दाट झाडी आहे. रस्त्यानजीक झुडूपे वाढली आहेत. रस्ताही काही ठिकाणी अरूंद आहे. रात्री समोरून येणाऱ्या वाहनांच्या प्रकाशाने रस्त्याचा अंदाज येत नाही आणि त्यातच ही अस्ताव्यस्तपणे रस्त्यावर वाहने पार्क केली जात असल्याने धोका वाढत आहे.

Web Title: At the Khawaiye Hotel; Vehicles on the road!