जावलीत खरिपाच्या पेरणीला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:26 IST2021-06-17T04:26:23+5:302021-06-17T04:26:23+5:30

कुडाळ : राज्यात माॅन्सूनच्या पावसाने हजेरी लावल्याने शेतीच्या कामांना गती मिळाली आहे. पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण करून शेतकरी आता ...

Kharif sowing begins in Jawali | जावलीत खरिपाच्या पेरणीला सुरुवात

जावलीत खरिपाच्या पेरणीला सुरुवात

कुडाळ : राज्यात माॅन्सूनच्या पावसाने हजेरी लावल्याने शेतीच्या कामांना गती मिळाली आहे. पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण करून शेतकरी आता खरीप पिकांच्या पेरणीच्या कामात व्यस्त असल्याचे पाहावयास मिळत आहे. मॉन्सूनची हजेरी लावल्याने शेतकरी समाधानी झाला आहे. पावसाने जमिनीत पुरेशी ओल निर्माण झाली असून, शेतकऱ्यांची पेरणीच्या कामांची लगबग सुरू झाली आहे.

जावळी तालुक्यात खरीप पिकाखालील सरासरी क्षेत्र १९५०० हेक्टर असून, तालुक्यामध्ये प्रामुख्याने भात ८८०० हेक्टर, नाचणी ७१५ हेक्टर, सोयाबीन ३५०० हेक्टर, भुईमूग ३००० हेक्टर व उर्वरित क्षेत्र कडधान्य मका, ज्वारी, गळीत धान्य पिकाखाली आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांना पिकासाठी वेळेत व वाजवी दरात खते बियाणे मिळण्याकरिता शेतकरी गटांच्या माध्यमातून आजअखेर २८३ मेट्रिक टन खते ९७८ क्विंटल बियाणांचा बांधावर पुरवठा करण्यात आलेले आहे.

दिवसेंदिवस गावोगावी बैलजोड्यांची संख्या कमी होत आहे. यामुळे बहुतांश ठिकाणी पारंपरिक बैलजोडीच्या ऐवजी ट्रॅक्टरनेच पेरणी होताना दिसत आहे. शेतकरीही आधुनिक झाला असून, यांत्रिकीकरणाचा उपयोग करू लागला आहे. काही ठिकाणी धूळवाफेवरही पेरण्या केल्या आहेत. तालुक्याच्या पश्चिम भागात भाताची लागवड मोठ्या प्रमाणात होते. याकरिता भाताची रोपे तयार करण्याच्या कामात शेतकरी मग्न आहेत. पेरणीसाठी लागणारे बी-बियाणे ,खते यांच्या खरेदीसाठी बळीराजाची लगबग सुरू आहे. या हंगामात प्रामुख्याने भात, सोयाबीन, भुईमूग, हायब्रीड, कडधान्य आदी पिकांचे उत्पादन घेतले जाते.

(चौकट)

कृषी विभागाकडून पुरवठा व मार्गदर्शन

शेतकऱ्यांकडील सोयाबीन बियाण्याची कमतरता उगवणक्षमता तपासून चांगले असणारे बियाणे ग्राम पातळीवरच इतर शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच क्षेत्रीय पातळीवर शेतकऱ्यांना सोयाबीन व भात पिकाबाबत सर्व माहिती देण्यासाठी ग्रामपातळीवर कृषी सहायक यांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जात आहे. फळबाग लागवड करण्यासाठी अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी प्रस्ताव घेण्यात येत आहेत.

Web Title: Kharif sowing begins in Jawali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.