फलटण तालुक्यात खरीप हंगाम धोक्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:43 IST2021-08-14T04:43:26+5:302021-08-14T04:43:26+5:30

आदर्की : फलटण तालुका शासन दरबारी रब्बीचा असला तरी खरीप हंगामात धोम-बलकवडीचे पाणी व जून महिन्यात चांगला पाऊस पडल्याने ...

Kharif season in danger in Phaltan taluka! | फलटण तालुक्यात खरीप हंगाम धोक्यात!

फलटण तालुक्यात खरीप हंगाम धोक्यात!

आदर्की : फलटण तालुका शासन दरबारी रब्बीचा असला तरी खरीप हंगामात धोम-बलकवडीचे पाणी व जून महिन्यात चांगला पाऊस पडल्याने बाजरीबरोबर कडधान्य, तेलबियांची पेरणी झाली; पण पिके बहरत असताना पंधरा दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याने पिके सुकू लागल्याने खरीप हंगाम वाया जाण्याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.

फलटण तालुका शासन दरबारी रब्बीचा आहे; पण निसर्गाचे ऋतूचक्र बदलल्याने व धोम-बलकवडी उजव्या कालव्यातून पाण्याची दोन आर्वतने वर्षातून सुटतात; पण पोट कालव्यांची कामे अपूर्ण असल्याने बांधापर्यंत पाणी पोहोचत नाही. कोरोनामुळे गत वर्षापासून रास्त भाव दुकानातून धान्य मोफत मिळत असल्याने बाजरी, ज्वारीला बाजारात मागणी नसल्याने शेतकऱ्यांकडे धान्य पडून आहे. बाजारात बाजरीला १,२०० ते १,४०० रुपये क्विंटलचा दर असल्याने यावर्षी शेतकऱ्यांनी बाजरी पिकाकडे पाठ फिरवून कडधान्य घेवडा, मूग, चवळी तर तेलबिया सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल आदी पिकांची पेरणी केली. पेरणीवेळी पर्जन्यमान चांगले राहिल्याने उगवण चांगली झाली. पिके जोमदार आली; पण आंतरमशागतीनंतर खते देताना युरियाच्या तुटवड्यामुळे पिकांना वेळेत नत्र न मिळाल्याने पिकांची वाढ खुंटली.

आता बाजरी फुलोऱ्यात तर सोयाबीन, भुईमूग, शेंगाही फुलोऱ्यात आहेत. सूर्यफूल दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना पावसाने ओढ दिल्याने घेवडा, मूग, चवळीची फूलगळ होऊन पिके सुकू लागल्याने शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे. यावर्षी प्रथमच पीक पद्धतीमध्ये बदल करून तेलवर्गीय पिकाकडे शेतकरी वळला. कडधान्य पिके पावसाच्या पाण्यावर चांगली येतात. धोम-बलकवडी कालव्याला पाणी सोडले आहे; पण पोट कालव्यांची कामे अपूर्ण असल्याने शेताच्या बांधावर पाणी जात नाही. त्यासाठी विद्युत मोटारीने पाईपलाईनद्वारे पाणी पिकांना पाणी देण्यासाठी विजेचा खेळखंडोबा सुरू असतो. या चार-पाच दिवसात पावसाने हजेरी लावली तर शेतकऱ्यांच्या हाती थोडीफार पिके लागतील. नाहीतर खरीप हंगाम वाया जाणार असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

(कोट..)

शेतकऱ्याच्या धान्य, भाजीपाल्याला कवडीमोल दर मिळत असताना खते, इंधन, वीज यांचे दर वाढले. आता शेतकऱ्याने खरीप हंगामातील मशागत, पेरणी, बी-बियाणे, खते यावर लाखो रुपये खर्च केला. पिके हाताला लागतेवेळी पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगाम वाया जाणार आहे.

- त्र्यबंकराव बोबडे, बिबी, फलटण

१३ आदर्की

फोटो - आदर्की परिसरात पावसाने दडी मारल्याने पिके सुकू लागली आहेत. (छाया : सूर्यकांत निंबाळकर)

Web Title: Kharif season in danger in Phaltan taluka!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.