खंडोबा-म्हाळसा विवाह सोहळा वडगाव हवेलीत थाटात साजरा
By Admin | Updated: January 5, 2015 00:45 IST2015-01-04T21:30:56+5:302015-01-05T00:45:09+5:30
‘चांगभलं’चा गजर : पालखी मिरवणुकीमुळे चैतन्याचे वातावरण

खंडोबा-म्हाळसा विवाह सोहळा वडगाव हवेलीत थाटात साजरा
वडगाव हवेली : येथील ग्रामदैवत खंडोबा व म्हाळसाकांत देवाचा विवाह सोहळा थाटात साजरा झाला. मिरवणुकीत भाविकांनी केलेल्या भंडाऱ्याच्या उधळणीने व ‘खंडोबाच्या नावानं चांगभलं.. म्हाळसाच्या नावानं चांगभल’च्या जयघोषाने गावचा परिसर दणाणून गेला. ‘श्रीं’च्या विवाह सोहळ्याने यात्रेतील कार्यक्रमांना सुरुवात झाली.
सकाळी मानकरी बैलगाडे व रथामध्ये बसून गावालगतच्या मंदिरात आले. त्याठिकाणी विधीवत नैवेद्य दिल्यानंतर सजवलेल्या पालखीत ‘श्रीं’च्या मूर्ती ठेवण्यात आल्या. तेथून पालखी आणि रथासह बैलगाड्यांच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. त्यामध्ये मानकऱ्यांच्या सासनकाठ्या, दिवट्या, घोडे, धनगरी गजीढोलाचा सहभाग होता. वाजतगाजत रथ व पालखी गावातून श्री सिध्देश्वर मंदिरापर्यंत गेली. मिरवणुकीत सुवासिनींनी पालखीच्या सारथी व ‘श्रीं’चे औक्षण केले. दुपारी एक वाजता मानकऱ्यांकडील लग्नमंडपात मिरवणूक आल्यानंतर तेथे मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर ‘श्रीं’चा विवाह सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लग्नानंतर मानकऱ्यांचा नैवेद्य येऊन तेथे ‘श्रीं’चे भोजन झाले. त्यानंतर आरती व वाघ्या-मुरळीचा कार्यक्रम झाला. त्यावेळी लंघर (साखळी) तोडण्याचा कार्यक्रम पार पडला. सायंकाळी कुंभार समाजाचा मानाचा रुखवत मंडपात आल्यानंतर महिलांचा उखाणे घेण्याचा कार्यक्रमही झाला. रविवारी ‘श्रीं’च्या लग्नाची वरात निघाली. वरात मंडपात आल्यानंतर तेथे मानाचे खोबरे व भंडारा दिल्यानंतर यात्रेची सांगता झाली. यात्रेनिमित्त विविध धार्मिक व करमणुकीचे कार्यक्रम शांततेत पार पडले. (वार्ताहर)