कोरोना निधीवरून पाटण पंचायत समिती सभेत खडाजंगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:43 IST2021-05-25T04:43:04+5:302021-05-25T04:43:04+5:30
रामापूर पाटण तालुक्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पाटण पंचायत समितीच्यावतीने ५० लाख रुपयांचा निधी उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी ...

कोरोना निधीवरून पाटण पंचायत समिती सभेत खडाजंगी
रामापूर
पाटण तालुक्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पाटण पंचायत समितीच्यावतीने ५० लाख रुपयांचा निधी उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी पाटण पंचायत समितीमधील सभापती, उपसभापती, पंचायत समिती सदस्य, तालुक्यातील सर्व सरपंच आपले एक महिन्याचे मानधन, तर अधिकारी, कर्मचारी, ग्रामसेवक, टीपीओ कर्मचारी आणि सेवक एक दिवसाचा पगार देतील, अशी माहिती सभापती राजाभाऊ शेलार यांनी बैठकीत दिली. दरम्यान, हा निधी गोळा करण्याबाबत सर्व सदस्यांना विश्वासात घेतले नसल्याचा आरोप करून आम्हाला पूर्वकल्पना का दिली नाही? असा प्रश्न उपस्थित करत विरोधी गटाच्या सदस्यांनी याला विरोध दर्शविल्याने दोन्ही गटात ऑनलाईन जोरदार खडाजंगी झाली.
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, पाटण पंचायत समितीची मासिक सभा ऑनलाईन घेण्यात आली. यामध्ये सातारा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनी सहभाग घेतला, तर राजाभाऊ शेलार, उपसभापती प्रतापराव देसाई, गटविकास अधिकारी मीना साळुंखे, सहायक गटविकास अधिकारी, सर्व पंचायत समिती सदस्य यांनी सहभाग घेतला. तालुक्यात कोविड सेंटरमध्ये रुग्णांकरिता व्हेंटिलेटरची सोय उपलब्ध करून दिल्याबद्दल माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर व गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला.
पाटण पंचायत समितीमार्फतही आपले योगदान म्हणून कोरोनासाठी सभापती व उपसभापती म्हणून एक महिन्याचे मानधन आम्ही देणार आहे; तर सदस्यांनीही एका महिन्याचे मानधन द्यावे, असे आवाहन सभापती रामभाऊ शेलार यांनी केले. विरोधी सदस्य पंजाबराव देसाई यांनी ही संकल्प चांगला आहे, त्याला आमचीही सहमती आहे. मात्र सर्वांना विश्वासात घेतले असते, तर बरे झाले असते, असा टोलाही लगावला.
तालुक्यातील नवीन ३० शाळेच्या वर्गखोल्यांना मंजुरी मिळाली आहे. कोविडकरिता ६५० शिक्षकांना ड्युटी लावली असून, शिक्षक राखीव ठेवले असल्याची माहिती शिक्षणाधिकारी यांनी दिली. कार्यरत असलेल्या शिक्षकांचे लसीकरण पूर्ण करूनच त्यांना ड्युट्या लावाव्यात, त्यांचा जीव धोक्यात घालू नका, अशी माहिती सदस्य सुरेश पानस्कर यांनी केली.
आरोग्य विभागाचा आढावा देताना वैद्यकीय अधिकारी आर. बी. पाटील यांनी तालुक्यातील कोरोनाचा अहवाल सादर केला. त्यामध्ये कोरोनाची सर्व माहिती सर्वांना दिली. ज्या विभागात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत तेथील डॉक्टरांना इतर ठिकाणी ड्युटी लावू नये, अशी मागणी सदस्या रूपाली पवार यांनी केली.
ऑनलाईनच्या मिटिंगमध्ये सातारा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनीही सहभाग घेतला. ते म्हणाले की, तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यासाठी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात ३० बेड ची सुविधा मुलांच्यासाठी उपलब्ध करून ठेवावी. सभापती राजाभाऊ शेलार यांनी स्वागत केले. उपसभापती प्रतापराव देसाई यांनी आभार मानले.