भूमी अभिलेखमध्ये वाढतोय खाबूगिरीचा आलेख!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:41 IST2021-09-03T04:41:20+5:302021-09-03T04:41:20+5:30
खंडाळा : शेतकऱ्यांना आपल्या जमिनीचे व्यवहार सुरळीत व्हावेत. त्यांची मोजणी करून नकाशा मिळावा, यासह इतर कामांसाठी तालुक्यातील सर्वसामान्य जनता ...

भूमी अभिलेखमध्ये वाढतोय खाबूगिरीचा आलेख!
खंडाळा : शेतकऱ्यांना आपल्या जमिनीचे व्यवहार सुरळीत व्हावेत. त्यांची मोजणी करून नकाशा मिळावा, यासह इतर कामांसाठी तालुक्यातील सर्वसामान्य जनता भूमी अभिलेख कार्यालयात खेटे मारत असतात. मात्र, या कार्यालयात कागदपत्रांच्या आडून लोकांना त्रास देण्यास उद्योग राजरोसपणे सुरू असल्याचे दिसून येते. लोकांना किरकोळ कामांसाठीही आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याने जनतेतून नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे भूमी अभिलेख कार्यालयातील खाबूगिरीचा वाढता आलेख कसा खुंटणार, हा यक्ष प्रश्न आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून जनतेला दिलासा द्यावा, ही माफक अपेक्षा लोकांची आहे.
खंडाळा तालुक्यात गेल्या दहा वर्षांत आमूलाग्र बदल घडला आहे. तालुक्यात वसलेली औद्योगिक वसाहत यासाठी प्रमुख कारण बनलेली आहे. नवीन औद्योगिक वसाहतीमुळे इथल्या जमिनींना सोन्याचे भाव आले आणि खरेदी-विक्रीच्या उलाढालीही मोठ्या प्रमाणात झाल्या. आजही या अनुषंगाने मोठमोठी कामे सुरू आहेत. त्याचबरोबर शेतीचे मूल्य समजल्याने इथला शेतकरी जागृत झाला आहे. आपली उर्वरित जमीन नीटनेटकी ताब्यात राहावी, यासाठी प्रत्येक जण त्याची मोजदाद करण्याच्या मागे धावतो आहे.
जमिनीची मोजणी करण्यासाठी अर्ज करणे, त्याचे चलन भरणे, प्रत्यक्ष मोजणी करणे, चतु:सीमा ठरवणे, नकाशा तयार करणे या कामांसाठी खेडोपाड्यांतील लोक भूमी अभिलेख कार्यालयात खेटे घालत असतात. मात्र, या कामांच्या पूर्ततेसाठी चिरीमिरीची मागणी करून लोकांची अडवणूक केली जाते. मोजणीसाठी चलन भरायचे असते. मात्र, ते चलन काढण्यासाठी पैशांची मागणी केली जात असल्याचा अनेक जणांनी अनुभव घेतला आहे, तर साधा नकाशा काढण्यासाठी शोधणाऱ्या शिपायापासून कक्ष अधिकाऱ्यापर्यंत प्रत्येकाचा वाटा वेगळा असतो. त्याशिवाय कागद हातात पडत नाही. मोजणीसाठी भूमापकाला गावापर्यंत नेण्याची सोय करणे, त्यांना भत्ता देणे हे तर जणू काही सक्तीचेच असल्याचे दिसून येते. मात्र, सामान्य माणसाला याबाबत बोलताही येत नाही आणि काही करताही येत नाही. कोणाकडे काही सांगावे, तर कामात विनाकारण त्रुटी काढल्याने अडून पडण्याची भीती वाटते. त्यामुळे मूग गिळून गप्प बसण्यापलीकडे त्यांना मार्गच नसतो. त्यामुळेच या समस्यांबाबत लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे आहे.
चौकट...
वेळेचा धाक...
गावोगावचा सामान्य शेतकरी आपली कामे आटोपून वेळ मिळेल तसा तालुक्याला येत असतो. आपले काम होईल, ही भाबडी आशा त्याला असते. मात्र, या कार्यालयात दुपारी १ वाजेनंतर अर्जही स्वीकारले जात नाहीत. कित्येकदा लोकांना माघारी जावे लागते. येण्या-जाण्याच्या खर्चाचा भार मात्र त्यांना सहन करावा लागतोच. शिवाय या वेळेच्या धाकामुळे पुन्हा खेटे मारावे लागतात.
चौकट..
अनावश्यक पैसे देण्याची सवय...
खंडाळ्यात वाढत्या औद्योगिकीकरणाने अनेक मोठ्या लोकांनी, गुंतवणूकदारांनी जमिनी खरेदी केल्या. याबाबतची कामे तातडीने व्हावीत, यासाठी शासकीय कार्यालयात अनावश्यक पैसे देण्याची सवय लावली. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांना सामान्य शेतकऱ्यांकडूनही तशीच अपेक्षा लागून राहिली आहे. त्यामुळे कामे करताना शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
.........................................