स्ट्रॉबेरीच्या वनात फुलले काश्मीरचे ‘केशर’! सह महिन्यांपूर्वीच्या कंदास आली फुले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2021 07:52 IST2021-02-06T07:50:58+5:302021-02-06T07:52:06+5:30
Satara News : स्ट्रॉबेरी हब असणाऱ्या महाबळेश्वर तालुक्यात नव्याने प्रायोगिक तत्त्वावर मेटगुताड व क्षेत्र महाबळेश्वर येथे केलेली काश्मिरी केशर लागवड यशस्वी झाली आहे.

स्ट्रॉबेरीच्या वनात फुलले काश्मीरचे ‘केशर’! सह महिन्यांपूर्वीच्या कंदास आली फुले
पाचगणी (जि. सातारा) - स्ट्रॉबेरी हब असणाऱ्या महाबळेश्वर तालुक्यात नव्याने प्रायोगिक तत्त्वावर मेटगुताड व क्षेत्र महाबळेश्वर येथे केलेली काश्मिरी केशर लागवड यशस्वी झाली आहे. सहा महिन्यांपूर्वी लागवड केलेल्या कंदाला आता फुले लगडली असून ती परिपक्व होऊ लागली आहेत.
महाबळेश्वर तालुक्यात सप्टेंबरमध्ये मेटगुताड व क्षेत्र महाबळेश्वर येथील शेतकऱ्यांनी प्रायोगिक तत्त्वावर केशर लागवड केली होती. महाबळेश्वरचे थंड वातावरण पोषक असल्याने लागवडीचा प्रयोग करण्यात आला होता. लागवड केलेल्या कंदाची योग्य ती निगा राखून जोपासना केल्याने त्या प्रयोगाला यश आले आहे. या लागवड केलेल्या रोपांना आता फुले आली आहेत, तीच फुले परिपक्व होऊन त्यातूनच केशरचे उत्पादन मार्च महिन्यात होणार आहे. यामुळे येथील शेतकऱ्याला नवीन पर्याय उपलब्ध झाला असून, आर्थिक सुबत्ता देणाऱ्या स्ट्रॉबेरीला हे पर्यायी पीक ठरणार आहे.
जम्मू- काश्मीरच्या कोमपूर व किश्तवाड गावात केशरची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते, तेथूनच महाबळेश्वरच्या कृषी विभागाने लागवडीकरिता ४५० कंद प्रति ५० रुपये दराने उपलब्ध केले होते. काश्मिरी केशर जगभरात प्रसिद्ध आहे. केशरची बाजार किंमत साडेतीन लाख रुपये किलो आहे. साधारणत: एक ते दीड लाख फुलाच्या परागकणांमधून एक ते दीड किलो केशर निघते.
क्षेत्र महाबळेश्वर येथे लागवड केलेल्या काही केशर कंदास फुले आल्यामुळे महाबळेश्वरमधील वातावरणामध्ये केशर लागवड यशस्वी होईल, असा विश्वास आहे.
- दीपक बोर्डे, कृषी सहायक, महाबळेश्वर