‘कास’ची ‘टेस्ट’ सुरू!
By Admin | Updated: June 8, 2016 00:19 IST2016-06-07T21:45:21+5:302016-06-08T00:19:20+5:30
उंची वाढविणार : जिहे-कटापूर धरण विभागामार्फत कामाला वेग

‘कास’ची ‘टेस्ट’ सुरू!
पेट्री : ‘शहराच्या पश्चिमेस सातारा-बामणोली मार्गावर २५ किलो मीटर अंतरावर कास तलाव आहे. सातारा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कास तलावाची उंची वाढविण्याच्या दृष्टीने प्राथमिक तपासणीत माती, दगडाचे नमुने सॉईल टेस्ट मशीनद्वारे घेण्यास गेल्या तीन-चार दिवसांपासून जिहे-कटापूर प्रकल्प उपविभाग, सातारा यांच्याकडून सुरुवात झाली असून, हे नमुने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाकडे तपासणीसाठी पाठविले जाणार आहेत. कास तलाव उंची वाढविण्याच्या अनुषंगाने या टेस्ट घेतल्या जात आहेत. मात्र, केवळ तपासणी म्हणून आम्ही हे काम हाती घेतले आहे,’ अशी माहिती जिहे-कटापूर योजनेचे कार्यकारी अभियंता शरद गायकवाड यांनी दिली.
कास तलावानजीक खालील बाजूस माती व दगडाचे नमुने घेण्यासाठी एकूण नऊ ठिकाणे निश्चित केलेली असून, सध्या चार ठिकाणी सॉईल टेस्ट मशीनद्वारे माती व दगडाचे नमुने तपासणीसाठी घेतले जात आहेत. तदनंतर उर्वरित पाच ठिकाणचे दगड, मातीचे नमुने तपासणीसाठी घेतले जाणार आहेत. या मशीनद्वारे १२० फूट खोल जाऊन तीन मीटरवर माती, त्या खालोखाल साडेचार मीटरवर जांभा खडक, त्याखाली साडेचार ते सहा फुटावर परत माती असे नमुने प्लास्टिक पिशवीत घेऊन पाटबंधारे विभागाकडे पाठविले जाणार आहेत, अशी माहिती घटनास्थळी सुरू असलेल्या कामावरील कामगाराने सांगितली. तसेच काळा खडक लागल्यांनतर त्याखाली पाच मीटर पर्यंतच्या तपासणीसाठी नमुने घेतले जाणार आहेत. जिहे-कटापूर धरण विभागामार्फत कास धरण उंची वाढविण्याचे काम केले जाणार आहे. (वार्ताहर)
अनेक समस्यांना पूर्णविराम..!
कास तलावाची उंची वाढवल्याने धरणात जास्त प्रमाणात पाणीसाठा वाढला जाणार आहे. तसेच तलावाच्या दक्षिणेस खालील बाजूस असणाऱ्या संरक्षक पुलावरून तीन ते चार फुटांपर्यंत पावसाळ्यात पाणी वाहून दिवस दिवसभर वाहतूक थांबून पुला पलीकडील गावे संपर्कहीन होतात. तसेच काहीजण जीव मुठीत धरून कंबरे एवढ्या पाण्यापलीकडे जातात. त्यामुळे एखादी विपरित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे धरणाची उंची वाढविल्यानंतर या समस्या सुटल्या जाणार आहेत.
भूगर्भातल्या स्तराची तपासणी करून जो अभिप्राय कार्यालयास प्राप्त होईल त्यानुसार पायाची खोली निश्चित करून राष्ट्रीय हरित प्राधिकरणाची परवानगी आल्यानंतर साधारण दिवाळीत कामास सुरुवात होईल. भूगर्भाच्या स्तराचे नमुने तपासणीसाठी एकूण नऊ छिद्रांपैकी चार छिद्रांचे काम संपत आले असून, उर्वरित काम दहा ते बारा दिवसांत पूर्ण होईल.
- ए. जी. मोमीन, शाखा अभियंता जिहे-कटापूर प्रकल्प उपविभाग सातारा.