कार्वेची रताळी पोहोचली परदेशात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:44 IST2021-09-12T04:44:03+5:302021-09-12T04:44:03+5:30
कऱ्हाड तालुक्यात कृष्णा-कोयना नदी तीरावर वसलेल्या कार्वे शिवारात रताळी हे नगदी पीक म्हणून रब्बी-खरीप हंगामांमध्ये मोठ्या प्रमाणात घेतले जाते. ...

कार्वेची रताळी पोहोचली परदेशात!
कऱ्हाड तालुक्यात कृष्णा-कोयना नदी तीरावर वसलेल्या कार्वे शिवारात रताळी हे नगदी पीक म्हणून रब्बी-खरीप हंगामांमध्ये मोठ्या प्रमाणात घेतले जाते. जशी तासगावची द्राक्षे, नागपूरची संत्री, जळगावची केळी, तशी कार्वेची रताळी देशातच काय; पण परदेशातही प्रसिद्ध आहेत.
कार्वेच्या शिवारात रताळी पीक घेतले जाते. रताळी पिकास काळी-तांबडी भुसभुशीत व निचऱ्याची जमीन आवश्यक असते. पूर्वी रताळीचे क्षेत्र मर्यादित होते. उत्पादनसुद्धा तसे जेमतेमच निघत होते. त्यावेळी प्रति एकरी ४ ते ५ टन एवढे उत्पन्न मिळत होते. प्रति क्विंटलचा दर १०० ते १२५ रुपये एवढा मिळत असे. पूर्वी रताळीस कऱ्हाड, कुंडल, मसूर, उंब्रज व मोठी बाजारपेठ सांगली येथे होती. सध्या एकरी रताळीचे उत्पादन ६ ते ७ टन एवढे मिळत आहे. त्यामुळे पुणे, मुंबई बाजारपेठेत किलोला १८ रुपये ते २० रुपये एवढा दर मिळतो. रताळीच्या कार्वे, बदलामपुरी, बेळगावी अशा जाती आहेत. सध्या ऊस उत्पादनाकडे शेतकऱ्यांचा कल दिसत आहे. कमी खर्चात व कमी व्यापात उसातून प्रति एकरी किमान ५० ते ८० टन एवढे उत्पादन शेतकऱ्यांना मिळते. मात्र, ऊस उत्पादनास एक वर्षे ते दीड वर्षाचा कालावधी जातो, तर रताळी पिकास ४ ते ५ महिने कालावधी लागतो. कमी कालावधीत जास्त उत्पादन देणारे रताळी हे पीक आहे.
रताळी हे प्रथम उपवासाकरिता वापरले जाते. येथील रताळी देशातच नव्हे तर दुबई, चीन, अमेरिका, जपान, फ्रान्स, बल्गेरिया, इटली, इंग्लड आदी देशांत मोठ्या प्रमाणात पाठवली जातात. त्यासाठी पुणे, मुंबई, दिल्ली, कोलकाता येथून एजंटांच्या माध्यमातून ही खरेदी-विक्री होते.
- युवराज मोहिते
- कोट
रताळी हे पीक ४ ते ५ महिन्यांचे नगदी पीक असून, या पिकापासून कमी कालावधीत चांगले उत्पादन मिळते, तसेच खर्चही कमी होतो. रताळीस खेड्या-पाड्यांपासून शहरापर्यंत, तसेच देशात सर्वत्र मोठी मागणी आहे. हे पीक चांगले उत्पादन देणारे असून, शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक फायदा होत आहे.
- विश्वास थोरात, शेतकरी
- कोट
रताळी पिकाची पूर्वी कुदळीने खांदणी करून काढणी केली जात होती. त्यासाठी मजुरांची आवश्यकता निर्माण होत होती. मात्र, आता आधुनिकीकरणामुळे ट्रॅक्टरच्या फनपाळीच्या अवजाराने रताळीची काढणी होते. त्यामुळे मजुरांचा त्रास कमी झाला आहे.
- राजेंद्र थोरात, शेतकरी
फोटो : १०संडे०६,०७,०८
कॅप्शन : प्रतिकात्मक