कऱ्हाडचा पारा चाळीस अंशांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:37 IST2021-04-06T04:37:50+5:302021-04-06T04:37:50+5:30
कऱ्हाड : कऱ्हाडचा पारा चाळीस अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. सोमवारी शहराचे कमाल तापमान ४०, तर किमान २१ अंश सेल्सिअस ...

कऱ्हाडचा पारा चाळीस अंशांवर
कऱ्हाड : कऱ्हाडचा पारा चाळीस अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. सोमवारी शहराचे कमाल तापमान ४०, तर किमान २१ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले आहे. उन्हाच्या झळा वाढल्यामुळे प्रत्येकाचा जीव कासावीस होत असून उकाड्याने हैराण केले आहे.
गत आठवड्यापासून उकाड्यात प्रचंड वाढ झाली आहे. सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या कालावधीत उन्हाच्या झळा अधिक जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे दुपारच्या वेळी शहरातील प्रमुख मार्ग व बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत आहे. नागरिक सूर्यास्तानंतरच खरेदीसाठी घराबाहेर पडत आहेत. यंदा उन्हाची तीव्रता लवकरच जाणवू लागली आहे. मार्च महिन्याच्या मध्यंतरानंतरच उन्हाचा तडाखा जाणवू लागला. उष्णतेत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळे उन्हापासून बचाव करण्यासाठी टोपी, छत्रीचा वापर सुरू झाला आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून तर उन्हाची तीव्रता आणखीनच वाढली आहे. त्याचा दैनंदिन कामावर परिणाम होत आहे. दिवसभर कडक ऊन असते. तसेच उकाडाही मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. शेतीची कामे दुपारच्या वेळेत ठप्प होत आहेत. घरात राहूनही उकाडा असह्य होत असल्यामुळे अनेक जण झाडांच्या सावलीत विसावा घेताना दिसून येत आहेत.
सोमवारी हवामान विभागाच्या वतीने कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले असून, यंदाच्या हंगामातील हे सर्वाधिक तापमान असावे. यापूर्वी गत काही दिवस पारा ३० ते ३४ अंशांवर होता. उन्हापासून बचाव व्हावा, यासाठी गॉगल्स, टोप्या, महिलांसाठी सनकोट अशा वस्तूंसह शीतपेयांना मागणी वाढली आहे.
- चौकट
आठवडाभरातील तापमान
दिनांक : कमाल : किमान
२८ मार्च : ३८ : २१
२९ मार्च : ३९ : २०
३० मार्च : ३८ : २०
३१ मार्च : ३९ : १९
१ एप्रिल : ३८ : १९
२ एप्रिल : ३७ : १९
३ एप्रिल : ३७ : २०
४ एप्रिल : ३९ : २२
५ एप्रिल : ४० : २१
(तापमान अंश सेल्सिअसमध्ये)
- चौकट
अशी घ्याल स्वत:ची काळजी
१) दररोज आठ ते सहा ग्लासापेक्षा जास्त पाणी प्यावे.
२) नारळपाणी, ताज्या फळांचा रस, ताक, लिंबूपाणी घ्यावे.
३) शक्यतो उन्हात बाहेर फिरणे टाळावे.
४) फिरताना सोबत छत्री, टोपी बाळगावी.
५) ताजी फळे व फळभाज्यांचे अधिक सेवन करावे.
६) मसालेदार, तेलकट व अतितिखट पदार्थ खाऊ नये.
७) आहारात टरबूज, अननस, गाजर, काकडी यांचा समावेश असावा.
- चौकट
खबरदारी घेणे गरजेचे
उष्णतेमुळे जाणवणारा दाहक परिणाम म्हणजे उष्माघात होय. यामध्ये शरीराचे तापमान अकस्मात उच्चपातळीवर जाते. योग्य ते उपचार वेळेवर न मिळाल्यास संबंधित व्यक्तीच्या मेंदूच्या उतींना नुकसान पोहोचून व्यक्ती कोमात जाण्याची व दगावण्याचीदेखील शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी उन्हात फिरताना अथवा काम करताना योग्य ती खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे.
..............................................................