कऱ्हाड येथेही गटबाजी चव्हाट्यावर
By Admin | Updated: August 22, 2014 22:06 IST2014-08-22T21:30:03+5:302014-08-22T22:06:18+5:30
महायुतीतील इतर स्थानिक नेतेही विमानतळावर अनुपस्थित

कऱ्हाड येथेही गटबाजी चव्हाट्यावर
कऱ्हाड : येथील विमानतळावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व दिवकर रावते यांचे शुक्रवारी सकाळी स्वागत करण्यात आले. कऱ्हाड-पाटण तालुक्यांतील शंभरवर शिवसैनिक स्वागताला उपस्थित होते खरे; पण त्यांच्यातील गटबाजी येथेही चव्हाट्यावर आली.
माजी आमदार शंभूराज देसाई यांच्यासह नरेंद्र पाटील, जिल्हाप्रमुख हर्षद कदम, नंदकुमार घाडगे, प्रा. नितीन बानुगडे-पाटील, संजय मोहिते, तात्या घाडगे हे उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी उपस्थित होते.
सकाळी दहा वाजल्यापासूनच भगव्या झेंड्याच्या गाड्या विमानतळावर दिसत होत्या. शिवसैनिक स्वागताला आले खरे; पण त्यांच्यातही गटबाजी दिसत होती. कऱ्हाड तालुक्यातील दोन गट स्वतंत्रपणे उभे होते. तर पाटण तालुक्यातील मूळचे शिवसैनिक स्वतंत्र उभे होते, आणि शंभूराज देसाई यांच्यासह त्यांच्या गटाचे कार्यकर्ते विश्रामगृहात बसून होते.
अकरा वाजण्याच्या सुमारास विमानाचे आवाज येऊ लागताच शिवसैनिक प्रवेशद्वाराजवळ जमले. विमान लॅन्ड झाल्यावर देसाई विश्रामगृहातून उठले आणि मागून येऊन थेट विमानाजवळ ठाकरेंच्या स्वागताला गेले. त्यावेळी घोषणा देणारे मूळ शिवसैनिक लांबच होते. मतभेदामुळे उपस्थित पदाधिकारी आणि त्यांचे कार्यकर्ते संवाद साधतानाही दिसत नव्हते. (प्रतिनिधी)
भगवी शाल आणि बुके
शंभूराज देसाई यांनी आज (शुक्रवारी) भगव्या रंगाचा खादीचा शर्ट परिधान केला होता. त्यामुळे सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे आपसूक जात होते. तर उद्धव ठाकरेंचे विमानतळावर स्वागत करतानाही त्यांनी भगवी शाल आणि बुके दिला.
शंभूराज आत आणि जिल्हाप्रमुख बाहेर
उद्धव ठाकरे विमानतळावरील विश्रामगृहात पाच मिनिटांसाठी थांबले होते. त्यादरम्यानही दिवाकर रावते हे शंभूराज देसार्इंच्या बरोबर होते; पण ज्यांच्या खांद्यावर पक्षाने नुकतीच जिल्ह्याची धुरा ठेवली आहे, ते जिल्हाप्रमुख हर्षद कदम आणि नंदकुमार घाडगे यांना आतमध्ये प्रवेश देण्यात आला नाही.