कऱ्हाड तालुक्याला पावसाने झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:29 IST2021-06-01T04:29:57+5:302021-06-01T04:29:57+5:30
तालुक्यात गत काही दिवसांपासून ठिकठिकाणी वळीव पाऊस हजेरी लावत आहे. काही दिवसांपूर्वी कऱ्हाड दक्षिणेतील बहुतांशी गावांत जोरदार पाऊस झाला ...

कऱ्हाड तालुक्याला पावसाने झोडपले
तालुक्यात गत काही दिवसांपासून ठिकठिकाणी वळीव पाऊस हजेरी लावत आहे. काही दिवसांपूर्वी कऱ्हाड दक्षिणेतील बहुतांशी गावांत जोरदार पाऊस झाला होता. तसेच इतर भागातही अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. सोमवारी दुपारीही अचानक पावसाचे वातावरण तयार झाले. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. काही वेळातच सर्वत्र पाणीच पाणी झाले. सुमारे पंधरा मिनिटांनंतर पावसाचा जोर ओसरला. पाऊस उघडीप देईल, अशी शक्यता असताना पुन्हा एकदा जोरदार सरी कोसळण्यास सुरूवात झाली. सुमारे तासभर पावसाचा जोर कायम होता. त्यानंतर हळूहळू पावसाने उघडीप दिली. या पावसाने शहरात ठिकठीकाणी पाणी साचले. तर उपमार्गही जलमय झाले.
सध्या शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीत व्यस्त आहेत. खरिपाच्या पेरणीसाठी जमीन तयार करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या कामाचा खोळंबा झाला. ऊस पिकासाठी हा पाऊस पोषक असला तरी टोमॅटो पिकाला पावसाचा मोठा फटका बसणार असून टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.
फोटो : ३१केआरडी०५
कॅप्शन : कऱ्हाड शहरासह तालुक्याला सोमवारी दुपारी वळीव पावसाने झोडपून काढले. जोरदार पावसामुळे शहरातील रस्त्यांवर पाणी साचले होते.