कऱ्हाडला ‘निर्मल शहर’साठी प्रयत्न गरजेचे!
By Admin | Updated: July 27, 2015 00:17 IST2015-07-26T21:54:18+5:302015-07-27T00:17:50+5:30
वानवा : अडीच हजार कुटुंबांकडे नाही वैयक्तिक शौचालय

कऱ्हाडला ‘निर्मल शहर’साठी प्रयत्न गरजेचे!
कऱ्हाड : राज्य शासनाच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत येथील नगरपालिकेने केलेल्या सर्वेक्षणात शहरातील दोन हजार पाचशे कुटुंबांकडे वैयक्तिक शौचालय नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या अभियानांतर्गत निर्मल शहर करण्यासाठी पालिकेला मेहनत घ्यावी लागणार असल्याचे दिसून येत आहे. राज्य शासनाने चार जुलैला राज्यभर शाळाबाह्य बालकांचा सर्व्हे केला. त्यावेळी नगरविकास विभागाने या सर्व्हेबरोबरच स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शहरातील शौचालयांचाही सर्व्हे करण्याचे आदेश दिले. त्यानुसार तोही सर्व्हे झाला. त्यानुसार ७४ हजार ३५५ लोकसंख्या असलेल्या कऱ्हाड शहरात सुमारे १६ हजार मिळकती आहेत. त्यातील कुटुंबांची संख्या १५ हजार ४७० आहे. त्यात वैयक्तिक शौचालय असलेल्या कुटुंबांची संख्या १२ हजार ९६३ आहे. या सर्वेक्षणात वैयक्तिक शौचालय नसणाऱ्या कुटुंबांची संख्या दोन हजार ५०७ असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामध्ये मार्केट यार्ड परिसरात ४२२, सोमवार पेठ परिसरात १६८, रुक्मिणीनगर, वाखाण रोड - २३५, मंगळवार पेठ ३५१, रविवार व शुक्रवार पेठ १३९, अशी आकडेवारी आहे. अन्य आकडेवारी एकत्रित करण्याचे काम सुरू आहे. वैयक्तिक शौचालय नसणाऱ्या कुटुंबांची संख्या सुमारे अडीच हजारांच्या घरात गेल्याचे पाहायला मिळते. या कुटुंबांकडून सध्या शहरातील सार्वजनिक शौचालयांचा वापर होत आहे.
पालिकेने शहरात २३ सार्वजनिक शौचालये उभारली असून, त्यात पुरुषांसाठी १८५ तर महिलांसाठी १९३ असल्याचे सांगण्यात आले. सार्वजनिक शौचालयात बालकांसाठी ५५ सीट्सची सोय केली आहे. दरम्यान, पालिकेने यापूर्वी २०१२-१३ मध्येही सर्वेक्षण केले होते. त्यावेळी दोन हजार ३४ कुटुंबांकडे शौचालये नसल्याचे स्पष्ट झाले होते. त्यावेळी शौचालये नसणाऱ्या कुटुंबांची संख्या कऱ्हाड ग्रामीणमध्ये सर्वाधिक होती. यावेळीही कऱ्हाड ग्रामीणमध्येच संख्या अधिक आहे. (प्रतिनिधी)