कऱ्हाड आरटीओची पावती पुस्तके नदीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 22:51 IST2018-03-16T22:51:19+5:302018-03-16T22:51:19+5:30
कऱ्हाड : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून पावती पुस्तके चोरणाऱ्या दोघांना शहर पोलिसांनी गुरुवारी अटक केली होती.

कऱ्हाड आरटीओची पावती पुस्तके नदीत
कऱ्हाड : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून पावती पुस्तके चोरणाऱ्या दोघांना शहर पोलिसांनी गुरुवारी अटक केली होती. त्यांनी चोरीची दोन पावती पुस्तके गुन्हा दाखल झाल्यानंतर नदीपात्रात फेकून दिल्याचे समोर येत असून, अन्य चार पुस्तके पोलिसांनी हस्तगत केली आहेत.
शैलेंद्र सदानंद नकाते (रा. मंगळवार पेठ, कऱ्हाड), प्रवीण प्रल्हाद साळुंखे ऊर्फ पप्पू परीट (रा. कोडोली, ता. कºहाड) अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे असून, त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात चोरलेल्या पुस्तकातील पावत्यांचा गैरवापर करून संशयितांनी वाहनधारकांकडून पैसे लुबाडले. हा प्रकार उघडकीस आल्यावर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील लिपिकाने कºहाड शहर पोलिसांत फिर्याद दाखल केली. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी नकाते व साळुंखे या दोघांना अटक केली. त्यांनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अडगळीत ठेवलेली चार चोरीची पुस्तके काढून पोलिसांना दिली. तर दोन पुस्तके गुन्हा दाखल झाल्यावर कºहाडजवळ नदीत फेकून दिल्याचे समोर येत आहे. या गुन्ह्यात संशयितांची संख्या वाढणार आहे.
पंचनामा होतोय ‘इनकॅमेरा’
गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने सलग दोन दिवस संशयितांना घेऊन पंचनामा केला. पंचनाम्याला कºहाड शहर पोलीस ठाण्यापासून सुरुवात झाली. पंचनामा इनकॅमेरा करण्यात आला असून, संशयितांचे जबाबही इनकॅमेरा घेण्यात आले. वाहनधारकांचे जबाबही इनकॅमेरा घेण्यात येतील, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले.