कऱ्हाड-चांदोली राज्यमार्ग बनला धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:24 IST2021-06-21T04:24:57+5:302021-06-21T04:24:57+5:30
कऱ्हाड ते चांदोली राज्यमार्गावर उंडाळेनजीक असणारा पाझर तलाव पहिल्याच पावसात तुडुंब भरला असून या तलावाच्या बाजूने राज्यमार्ग गेला आहे. ...

कऱ्हाड-चांदोली राज्यमार्ग बनला धोकादायक
कऱ्हाड ते चांदोली राज्यमार्गावर उंडाळेनजीक असणारा पाझर तलाव पहिल्याच पावसात तुडुंब भरला असून या तलावाच्या बाजूने राज्यमार्ग गेला आहे. बांधकाम विभागाने या तलावावर असणारी बॅरिकेड्स काढल्यामुळे येथे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. हा मार्ग पुढे कोकणात जातो. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या दोन प्रमुख विभागांना जोडणारा सर्वात जवळचा मार्ग म्हणून कऱ्हाड-चांदोली राज्यमार्गाकडे पाहिले जाते. नेहमीच या मार्गावर वाहनांची वर्दळ असते. सातारा, सोलापूर, कोल्हापूर या ठिकाणांहून जयगड बंदरात मोठ्या प्रमाणात साखर वाहतूक केली जाते. त्यामुळे ट्रक, डंपर यासारखी अवजड वाहने या मार्गाने रात्रंदिवस धावत असतात.
सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. रस्ते घसरडे झाले आहेत. या परिसरात रस्त्यावरील पथदिवेही अनेकदा बंद असतात. त्यामुळे अंधारात नवख्या चालकांना अंदाज न आल्याने वाहन थेट पाझर तलावात बुडून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- चौकट
सुरक्षा कठड्यांची गरज
कऱ्हाड-चांदोली मार्गानजीक काही ठिकाणी धोकादायक परिस्थिती आहे. रस्त्याच्या बाजुला मोठमोठ्या चरी आहेत. तसेच काही ठिकाणी तलाव तसेच विहिरी आणि घरेही आहेत. त्यामुळे आवश्यक त्याठिकाणी सुरक्षा कठडे उभारण्याची गरज आहे. कठडे न उभारल्यास भविष्यात या मार्गावर अपघात होण्याची शक्यता आहे.