को-२६५ जातीच्या उसाला मिळेना तोड
By Admin | Updated: December 21, 2015 00:55 IST2015-12-20T22:44:34+5:302015-12-21T00:55:41+5:30
शेतकऱ्यांच्या अडचणीत भर : कारखान्यांच्या चुकीच्या धोरणाचा ऊसउत्पादकांना फटका

को-२६५ जातीच्या उसाला मिळेना तोड
मल्हारपेठ : या वर्षीचा गळीत हंगाम सुरू होऊन एक महिना झाला. १३ महिने उसाचा कालावधी झाला. को-२६५ या ऊस जातीला प्राधान्य नाही, या कारणास्तव साखर करखान्याकडून ऊसतोडणीस नकार दिला जात असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.सध्याचा शेतकरी अभ्यासू आहे. ऊस संशोधन केंद्राने शिफारशी केलेल्याच ऊस बियाण्यांची निवड करून ऊस लावला जातो. परंतु साखर कारखाने ऊस रिकव्हरी, साखर उतारा कारणास्तव को—८६०३२ , ९२००५ या व अशा उसाला प्राधान्य देऊन ऊसतोड केली जात आहे व को-२६५ यास प्राधान्य नाही, असा नकार देऊन शेतकऱ्याच्या दु:खात भर टाकली जात आहे.
याबाबत पाडेगाव ऊस संशोधन केंद्र अधिकारी डॉ. सुरेश पवार यांना विचारले असता त्यांनी सांगितले की ऊस संशोधन केंद्रातून आजपर्यंत चांगल्याच जाती तयार झाल्या आहेत. को-२६५ हा वाण २००७ मध्ये संशोधनानुसार शिफारस केलेला आहे. याची उत्पादन क्षमता, रिकव्हरी, साखर उतारा उत्तम आहे व त्यास प्राधान्य आहेच; परंतु साखर कारखानदारांची चुकीची पॉलिसी आहे. शेतकरी मालक आहे. त्याने जाब विचारला पाहिजे. साखर कारखान्यांचे चुकीचे धोरण, ऊसतोडणीत काळाबाजार होत आहे. ऊसतोडीकरिता शेतकरी कारखान्याचे कार्यालये, खांडसरी, गुऱ्हाळ चालकांच्या विणवण्या करूनही ऊसतोड मिळत नसल्याने ऊस उत्पादक हताश झाला आहे. (प्रतिनिधी)
अशा उसाच्या शिफारशी करताच कशाला?
ज्या उसाला साखरकारखाना प्राधान्य देत नाही, अशा ऊस जातीच्या शिफारशी करताच कशाला? ऊस संशोधन केंद्र, विद्यापीठातून लावले जाणारे शोध हे शेती उद्योगाच्या वाढीसाठी असावे, अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकरी संघटनेचे निवास जाधव, बाळासाहेब जाधव, शिवाजी पवार आदींनी केल्या आहेत.
को-२६५ हा वाण संशोधनानुसार शिफारस केलेला आहे. याची उत्पादन क्षमता, रिकव्हरी, साखर उतारा उत्तम आहे व त्यास प्राधान्य आहेच; परंतु साखर कारखानदारांची चुकीची पॉलिसी आहे. याविरोधात शेतकऱ्यांनी जाब विचारला पाहिजे.
- डॉ. सुरेश पवार,
ऊस संशोधन केंद्र अधिकारी, पाडेगाव