जंगल पवनचक्क्यांच्या दावणीला!

By Admin | Updated: November 22, 2014 00:19 IST2014-11-21T21:10:17+5:302014-11-22T00:19:23+5:30

परिसरातील बाहे-पाचगणी गावच्या हद्दीतील जंगल तोडण्याचे काम सुरू आहे. ग्रामस्थांचा विरोध असतानाही असा प्रकार सुरू

Jungle windmills! | जंगल पवनचक्क्यांच्या दावणीला!

जंगल पवनचक्क्यांच्या दावणीला!

अरुण पवार - पाटण--मोरणा पठारावरील जंगलव्याप्त जागेत पवनचक्की कंपन्यांनी टॉवर उभारण्याचा सपाटा सुरू केला आहे. त्यासाठी वनविभागाशी सौदा करून जंगले ताब्यात घेण्याचे प्रकार सुरू आहेत. गेल्या दोन वर्षांपूर्वी रिसवडसारखे अभयारण्य वनविभागाने पवनचक्की कंपन्यांच्या घशात घातले. आता त्याच परिसरातील बाहे-पाचगणी गावच्या हद्दीतील जंगल तोडण्याचे काम सुरू आहे. ग्रामस्थांचा विरोध असतानाही असा प्रकार सुरू आहे.
येथील सुमारे २० हेक्टर परिसरातील झाडे तोडली जाणार आहेत. झाडे तोडण्याच्या ठेका वनविभागानेच घेतला असून, त्यास पाचगणी ग्रामस्थांनी विरोध केला आहे. एकीकडे झाडे लावा, झाडे जगवा आणि पर्यावरण संतुलित ग्राम’ योजना राबवून शासन पर्यावरण निर्मितीसाठी झटत आहे, तर दुसरीकडे वनविभागच पर्यावरणाचा कर्दनकाळ बनून जंगले पवनचक्कीसाठी देत आहे.
पाटणच्या मोरणा पठारावर हे प्रकार सुरू असून, रक्षकच भक्षक बनल्यामुळे या परिसरातील कोयना चांदोली अभयारण्याच्या सीमा धोक्यात आल्या आहेत.
जंगलव्याप्त; पण हवेच्या ठिकाणी आहे म्हणून तो भाग पवनचक्की कंपन्यांना टॉवर उभारणीसाठी म्हणजेच पवनचक्की पाती उभी करण्यासाठी द्यायचा हा विचित्र सौदा वनविभागातर्फे सुरू आहे. यासाठी केंद्र शासनाच्या भोपाळ येथील विभागाकडून परवानगी आणली जात आहे. यामुळे स्थानिक विभागाचे काही चालत नाही.


मुला-बाळांसारखी झाडे सांभाळायची आणि त्याच झाडांवर कुऱ्हाड चालवायची. सध्या वनविभागाचे कर्मचारी पवनचक्क्यांना वनजमिनी देत आहेत. पाचगणी गावच्या हद्दीत अशीच वृक्षतोड सुरू असून, वनसंरक्षण समितीला विश्वासात घेतले नाही. या प्रकारास आमचा विरोध आहे.
- किसन सुर्वे, सरपंच
===
पाचगणी वनक्षेत्रातील १९.६१ हेक्टर क्षेत्र पवनचक्की कंपनीला देण्यात आले आहे. त्या बदल्यात कोकणातील सावर्डे येथील जमीन वनविभागाला मिळाली आहे. पाचगणीतील झाडे तोडून त्यांचा लिलाव केला जाणार आहे.
- जी. एन. कोले, वनक्षेत्रपाल, पाटण


कुठे गेले पर्यावरणवादी?
पाटण भागात गेल्या काही वर्षांपूर्वी पर्यावरणवाद्यांनी चांगला दरारा निर्माण केला होता. मात्र पाटण तालुक्यातील जंगलव्याप्त भागात सध्या वृक्षतोड सुरू असताना याच पर्यावरणप्रेमींची तलवार म्यान झाल्याचे दिसते. अभयारण्यातील अतिक्रमणे, वृक्षतोड, पवनचक्क्यांची अतिक्रमणे याविरोधातील आवाज आता बंद झाला आहे.

Web Title: Jungle windmills!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.