सलमानला शिक्षा ठोठावणारे न्यायाधीश साताऱ्यात येणार
By Admin | Updated: May 8, 2015 00:18 IST2015-05-07T23:05:27+5:302015-05-08T00:18:07+5:30
उपजिल्हा न्यायाधीशपदी नियुक्ती : सुटीनंतर जूनपासून होणार रुजू

सलमानला शिक्षा ठोठावणारे न्यायाधीश साताऱ्यात येणार
सातारा : फिल्मस्टार सलमान खानला २००२ मधील ‘हिट अँड रन’ खटल्यात पाच वर्षांची सजा फर्मावणारे न्यायाधीश डी. डब्ल्यू. देशपांडे यांचा मुंबईतील हा शेवटचा निकाल आहे. निकालापूर्वीच त्यांच्या बदलीचे आदेश निघाले असून, ते सातारा न्यायालयात उपजिल्हा न्यायाधीश म्हणून जूनच्या पहिल्या आठवड्यात पदभार स्वीकारणार आहेत.
‘हिट अँड रन’ खटल्यात सलमानवर सदोष मनुष्यवधाच्या आरोपाची निश्चिती न्यायाधीश देशपांडे यांनीच केली. या खटल्यात त्यांनी सरकार पक्षाचे २७ तर बचाव पक्षाचा एक असे २८ साक्षीदार तपासले. सलमानला ४२१ प्रश्न विचारणारे न्यायाधीश देशपांडे या खटल्यानंतर सुटीवर जाणार आहेत. सातारचे उपजिल्हा न्यायाधीश म्हणून त्यांची बदली काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. तथापि, सुरू असलेल्या खटल्यांचा निकाल दिल्यानंतरच त्यांना तेथील पदभार सोडावयाचा होता. त्यामुळे सलमानचा खटला हाच मुंबईतील कारकीर्दीतील त्यांचा शेवटचा खटला ठरला आहे. त्यांची बदली हा नियमित बदलीचा भाग असल्याचे हायकोर्टाच्या रजिस्ट्रारने स्पष्ट केले आहे.
न्यायाधीश देशपांडे मूळचे नागपूरचे असून, मुंबईला सत्र न्यायालयात २०१२ मध्ये त्यांची नियुक्ती झाली. २०१४ मध्ये त्यांनी ‘सीबीआय’चे विशेष न्यायाधीश म्हणून काम पाहिले. मुंबईत ते प्रथम दादरच्या न्यायालयात अतिरिक्त न्यायदंडाधिकारी होते. डिसेंबर २०१३ पासून सलमानच्या ‘हिट अँड रन’ खटल्याची सुनावणी त्यांच्यापुढे सुरू झाली. २०१४ मध्ये विशेष न्यायाधीश म्हणून काम पाहिले असले, तरी त्यांच्यासमोर कोणताही महत्त्वाचा खटला चालला नाही. सलमानचा खटलाच त्यांच्या कारकिर्दीतील ‘हाय प्रोफाइल’ ठरला. मुंबईत नियुक्ती होण्यापूर्वी न्यायाधीश देशपांडे यांनी अलिबागमध्ये जिल्हा न्यायाधीश म्हणून काम पाहिले आहे. सलमानच्या खटल्यानंतर न्यायाधीश देशपांडे प्रसिद्धीच्या झोतात आले. (प्रतिनिधी)