फलटणमध्ये अतिक्रमणावर जेसीबीचा फावडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:38 IST2021-04-06T04:38:29+5:302021-04-06T04:38:29+5:30
फलटण : फलटण शहरातील भर बाजारपेठेत एका कापड दुकानदाराने कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता ‘हम करेसो कायदा’ या उक्तीप्रमाणे ...

फलटणमध्ये अतिक्रमणावर जेसीबीचा फावडा
फलटण : फलटण शहरातील भर बाजारपेठेत एका कापड दुकानदाराने कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता ‘हम करेसो कायदा’ या उक्तीप्रमाणे जुन्या इमारतीची तोडफोड करीत अनधिकृतपणे मुख्य रस्त्यांपर्यंत लोखंडी मोठा जिना टाकला होता. या प्रकाराने नागरिकांमध्ये आणि त्या परिसरातील दुकानदारांमध्ये अतिक्रमणाबद्दल संतप्त भावना व्यक्त होत असताना सोमवारी मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांच्या आदेशानुसार जेसीबीच्या सहाय्याने तो भला मोठा जिना तोडण्यात आला. मुख्याधिकाऱ्यांच्या या धडक कारवाईचे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
फलटण शहरात गजानन चौकानजीक एका कापड विक्रेत्याने भलेमोठे दुकान पहिल्या मजल्यावर टाकले असून, त्या दुकानात जाण्यासाठी आतून जिना असतानाही आपले कोणी काही करू शकत नाही, या भावनेतून त्याने बाहेरून भला मोठा जिना काढून तो रस्त्यावर आणून टाकला होता. या भल्यामोठ्या जिन्यामुळे खालील गाळेधारक वैतागले होते. या जिन्यामुळे त्यांना आत येणे जाणे ही अवघड होत होते. फलटण शहरात वर्षापूर्वी मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी अतिक्रमण मोहीम राबवून वर्षानुवर्षे असणारी शहरातील अतिक्रमणे जमीनदोस्त केली होती.
क्रांतीसिंह नाना पाटील चौक तर अक्षरश: त्यांनी अतिक्रमणमुक्त करून या चौकात होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविला आहे. आणखी काही अतिक्रमणे काढण्याची बाकी असताना कोरोनाचे कारण देत जिल्हाधिकाऱ्यांनी अतिक्रमण मोहीम मध्येच थांबविण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे मोठ्या धनदांडग्यांची अतिक्रमणे काढायची राहून गेल्याने ज्यांचे अतिक्रमण निघाले ते संतप्त झाले होते. मध्यंतरीच्या काळात काही सामाजिक कार्यकर्त्यांनी अतिक्रमणे काढण्यासाठी आंदोलने केली. त्यावेळी मुख्याधिकारी यांनी कोरोना संपताच अतिक्रमण काढण्याचे आश्वासन दिले होते. दरम्यान गेल्या दोन महिन्यांपासून गजानन चौक नारळी बागेमध्ये एका जुन्या कॉम्प्लेक्समध्ये पहिल्या मजल्यावर मोडतोड करून एका कापड दुकानदाराने कपड्याचे मोठे दुकान सुरू करण्याचा प्रयत्न चालू आहे. आता या कॉम्प्लेक्समध्ये पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी आतून जिना असतानाही त्या व्यापाराने रस्त्याच्या कडेला असणाऱ्या बाजूस मोडतोड करून भलामोठा जिना रस्त्यापर्यंत आणून ठेवला होता. हा जिना काढताना त्याने कोणाचीही परवानगी घेतली नव्हती. या जिन्यामुळे त्या कॉम्प्लेक्समध्ये खाली व्यापार करणाऱ्या दुकानदारांनाही येता जाता अडचण येत होती.
चौकट..
मुख्याधिकाऱ्यांचे सोशल मीडियावर कौतुक..
नागरिकांमधून जिन्याच्या अतिक्रमणाचाबद्दल संतप्त भावना उमटत होत्या. नगरपालिका कारवाई करणार का नाही, अशा प्रतिक्रिया उमटत असताना मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी सोमवारी नगरपालिका बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी व त्यांच्या सोबतीला जेसीबी पाठवून देऊन तो जिनाच जेसीबीच्या सहाय्याने उद्ध्वस्त करून टाकला आहे. या धाडसी कारवाईबद्दल मुख्याधिकाऱ्यांचे सोशल मीडियावर कौतुक होत असून, शहरातील इतरही अतिक्रमणे काढण्याची मागणी वाढू लागली आहे
कोट...
फलटण शहरात यापुढे कोणी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. संबंधित दुकानदाराने कोणतीही परवानगी न घेता जिना उभारला होता तो काढून टाकण्यात आला आहे.
- प्रसाद काटकर, मुख्याधिकारी
०५फलटण
दुकानदाराने रस्त्याच्या कडेला टाकलेला जिना तर दुसऱ्या छायाचित्रात हा जिना जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आला.