मृत्यूच्या जबड्यातून पुन्हा एकदा जीवनाच्या कुशीत
By Admin | Updated: May 11, 2014 23:59 IST2014-05-11T23:59:33+5:302014-05-11T23:59:33+5:30
मोहन मस्कर-पाटील ल्ल सातारा सातारा जिल्ह्यात ‘एमडीआर-टीबी’ रुग्णांचे उपचार करवून घेण्याचे प्रमाण शंभर टक्के असल्यामुळे शंभरपैकी ८१ रुग्ण

मृत्यूच्या जबड्यातून पुन्हा एकदा जीवनाच्या कुशीत
मोहन मस्कर-पाटील ल्ल सातारा सातारा जिल्ह्यात ‘एमडीआर-टीबी’ रुग्णांचे उपचार करवून घेण्याचे प्रमाण शंभर टक्के असल्यामुळे शंभरपैकी ८१ रुग्ण ‘एमडीआर-टीबी’ सारख्या महाभंयकर रोगापासून मुक्ततेकडे वाटचाल करू लागले आहेत. मृत्यूच्या जबड्याकडे गेलेले हे रुग्ण पुन्हा एकदा जीवनाच्या कुशीत आणणारा ‘एमडीआर-टीबी’ मुक्तीचा ‘सातारा पॅटर्न’ आता राज्यात लक्षवेधी ठरला आहे. याचे संपूर्ण श्रेय सातारा जिल्हा क्षयरोग केंद्रातील वरिष्ठ पर्यवेक्षक डॉ. पृथ्वीराज भोसले आणि त्यांच्या सहकार्यांना जाते. राज्यात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत हे प्रमाण सर्वात चांगले असून, महाराष्ट्राची सरासरी २७ टक्के आहे. जगभरात ‘मोस्ट किलिंग डिसीज’ (मृत्यू होणारा आजार) म्हणून ‘एमडीआर-टीबी’ची ओळख झाली आहे. डॉ. नितीन भालेराव, डॉ. पृथ्वीराज भोसले आणि त्यांच्या सहकार्यांनी राबविलेल्या शोधमोहिमेनंतर जून २०१२ मध्ये वाई तालुक्यात ‘एमडीआर-टीबी’चा पहिला रुग्ण आढळला. यानंतर जिल्ह्यात १२५ रुग्ण आढळले. हा आजार ‘टीबी’ झालेल्या रुग्णांनाच होतो. ‘टीबी’ तथा ‘क्षयरोग’ झालेला रुग्णाने औषधे घेताना धरसोड वृत्ती केली तर त्याला ‘एमडीआर-टीबी’ तथा ‘मल्टी ड्रग रेझिस्टन्स’ होतो. या आजाराला ‘विचित्र’ अथवा ‘कोडगा’ म्हणूनही ओळखले जाते. यासाठी सरकार एका रुग्णांवर वर्षाकाठी जवळपास चार ते साडेचार लाख रुपये खर्च करते. ‘टीबी’ बरा होण्यास सहा ते सात महिने तर ‘एमडीआर-टीबी’ बरा होण्यास दोन वर्षे लागतात. यावर शासनाकडून होणारा खर्च आणि कालावधी लक्षात घेता त्याची दाहकता लक्षात येते. ‘एमडीआर-टीबी’ रुग्णांना पुन्हा एकदा जीवनाच्या कुशीत आणण्याचे काम महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सातारा जिल्ह्याने सर्वाधिक चांगले केले आहे. ‘एमडीआर-टीबी’ रुग्णांनी सातारा जिल्हा क्षयरोग केंद्राने स्वत:चे एक प्रतिमान तयार केले आणि त्यानुसार उपचारपद्धती सुरू ठेवली आहे. ‘एमडीआर-टीबी’चा रुग्ण निश्चित झाल्यानंतर त्याला तत्काळ सात दिवसांत औषधे सुरू होतात. संबंधित रुग्णाची गुप्तता तर पाळलीच जाते, त्याचबरोबर तो औषधोपचार नियमित घेतो की नाही, याचा प्रत्येक आठवड्याला आढावा घेतला जातो. आशा वर्कर्स, परिचारिका त्यांच्या घरी वारंवार भेटी देतात. राज्यात इतर जिल्ह्यांत मात्र, सातार्यासारखी तत्परता दिसून आलेली नाही. परिणामी महाराष्ट्रात ‘एमडीआर-टीबी’ रुग्ण बरे होण्याकडे वाटचाल करण्याचे प्रमाण २७ टक्के इतके आहे आणि सातारा जिल्ह्याचे ८१ टक्के आहे. विशेष म्हणजे ‘एचआयव्ही-एमडीआर-टीबी’ रुग्ण कव्हर करणे अवघड असते. सातारा जिल्हा क्षयरोग केंद्रात मात्र, त्याच्या उलट आहे. येथे या आजारांच्या रुग्णांना कव्हर करण्यात बर्यापैकी यश आले आहे.