जावळीत १७ ग्रामपंचायतींची निवडणूक
By Admin | Updated: July 13, 2017 14:56 IST2017-07-13T14:56:59+5:302017-07-13T14:56:59+5:30
हालचाली गतिमान : केळघर, आनेवाडीचा समावेश

जावळीत १७ ग्रामपंचायतींची निवडणूक
आॅनलाईन लोकमत
मेढा (जि. सातारा), दि. १३ : जावळी तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून, शासनाच्या नवीन निर्णयानुसार आता होऊ घातलेल्या १७ ग्रामपंचायतींवर थेट सरपंचाची निवड होणार आहे. त्यामुळे राजकीय वतुर्ळात हालचाली गतिमान झाल्या आहेत.
बालेकिल्ला म्हणून जावळी तालुक्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व असून, या १७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत शिवसेना, भाजप उतरणार काय याची उत्सुकता जावळीकरांना लागली आहे. या १७ ग्रामपंचायतींमध्ये केळघर, आनेवाडी, करहर, आखाडे, कुसुंबी या राजकीदृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
जावळी तालुक्यात केळघर, आनेवाडी, करहर, आखाडे, कुसुंबी, मोरघर, वालुथ, रामवाडी, सोमर्डी, घोटेघर, वाकी, रुईघर, नांदगणे, शिंदेवाडी, ओझरे, रिटकवली आदी १७ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. हरकतींवर २५ जुलै रोजी सुनावणी होणार आहे.
३ आॅगस्ट रोजी अंतर्गत प्रभाग रचनेला मान्यता देण्यात येणार आहे. याबाबत हरकती ११ जुलैपर्यंत जावळी तहसील कार्यालयात स्वीकारण्यात आल्या आहेत.
यावेळी प्रथमच नागरिकांमधून थेट सरपंचाची निवड होत असल्याने नागरिकांच्यातही उत्सुकता वाढली आहे. तालुक्यातील केळघर, कुसुंबी, आनेवाडी, अखाडे, करहर या महत्त्वाच्या असणाऱ्या ग्रामपंचायतीचा सरपंच कोण होणार? याबरोबरच ही निवडणूक पक्षीय स्तरावर होणार की गट-तटाची याबाबत जनतेत जोरदार चर्चा सुरू आहे.
जावळी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य असून, शिवसेना व भाजपदेखील जोर धरू लागल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर या १७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांत जनतेतून सरपंच निवड असल्याने साऱ्या जावळीकरांचे लक्ष लागले आहे.